बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसह त्याच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:55 IST2026-01-02T09:51:00+5:302026-01-02T09:55:15+5:30
बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू व वडिलांविरोधात तक्रार दाखल; फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसह त्याच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?
Kunal Khemu: अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये गणला जातो. बालकलाकार इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या या अभिनेत्याची कारकिर्दीची उत्तमोत्तम चित्रपटांनी रंगलेली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. परंतु, सध्या कुणाल खेमू अडचणीत सापडला आहे. कुणालसह त्याचे वडील रवी खेमू या दोघांविरोघात फसवणूकीचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया...
दरम्यान, एका चित्रपटासाठी अॅडव्हान्स म्हणून २१ लाख रुपये घेऊनही कुणाल खेमूने हे आश्वासन पूर्ण केले नाही आणि अतिरिक्त पैशांची मागणी केली, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मुंबई न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आणि त्याचे वडील रवी खेमू यांच्या विरोधात दाखल केलेल्या कथित फौजदारी फसवणूक आणि विश्वासघाताच्या तक्रारीबाबत पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणी मुंबई न्यायालयाने ओशिवरा पोलिसांना नोटीस बजावली आहे. न्याय दंडाधिकारी (अंधेरी न्यायालय) सुजित कुमार सी. तायडे यांनी २९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की, भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम १७५(३) नुसार,या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन, संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या जबाबाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण प्रामुख्याने एका चित्रपट निर्मात्याने दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे.
त्यामध्ये चित्रपट निर्माते रवी दुर्गाप्रसाद अग्रवाल यांनी अभिनेता कुणाल खेमू आणि त्याचे वडील रवी खेमू यांच्यावर फसवणूक, विश्वासघाताचा आरोप केला आहे.निर्मात्याने तक्रारीत दावा केला आहे की, चित्रपट प्रोजेक्टसाठी दिलेली रक्कम ना निर्मितीच्या कामासाठी वापरली गेली, ना ती त्यांना परत करण्यात आली आहे.
चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्याला केलेला संपर्क....
तक्रारीनुसार, ते 'ओव्हरटेक' नावाचा एक हिंदी चित्रपट बनवत होते आणि त्यांनी मुख्य भूमिकेसाठी कुणाल खेमूला संपर्क साधला होता. या प्रोजेक्टसाठी कुणालने पसंती दर्शवली होती.शिवाय त्याच्या वडिलांनीही याबाबत आश्वासन दिलं होतं. त्यानंतर अभिनेत्याला २१ लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. अग्रवाल यांनी यापूर्वी २०१४ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती, परंतु २०१८ मध्ये तो खटला फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये आंबोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.