सेटवरील आगीत अभिनेत्री अडकली, मदतीसाठी ओरडली पण...; जीवाची पर्वा न करता 'बिग बीं'नी वाचवलेले प्राण, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:53 IST2025-10-14T15:47:45+5:302025-10-14T15:53:03+5:30
व्हीलचेअरवर बसून अभिनेत्री शो होस्ट करत होती अन् विपरीत घडलं; बिग बींनी वाचवलेले प्राण

सेटवरील आगीत अभिनेत्री अडकली, मदतीसाठी ओरडली पण...; जीवाची पर्वा न करता 'बिग बीं'नी वाचवलेले प्राण, काय घडलेलं?
Amitabh Bachchan:बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. गेल्या चार दशकांपासून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. बिग बींनी त्यांच्या या आजवरच्या प्रवासात अनेक अभिनेते, अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनयाबरोबर अमिताभ बच्चन यांनी काही शो होस्ट देखील केले आहेत. १९७० मध्ये दुरदर्शनवरील फूल खिलें है गुलशन गुलशन हा सेलिब्रिटी टॉक शोची प्रचंड चर्चा होती. अभिनेत्री तबस्सुम हा शो होस्ट करायच्या. त्याकाळी अमिताभ बच्चन कोणत्याही टॉक शोसाठी स्टुडिओमध्ये न जाता त्यांना सेटवर बोलवायचे. याचदरम्यान, सेटवर मोठी दुर्घटना घडली होती. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...
साल १९८० मध्ये अभिनेत्री तबस्स्युम या कल्याणजी- आनंदजी यांच्यासोबत परदेशात लाईव्ह शो करायच्या. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सुद्धा या शोसाठी हजर असायचे. एकदा मुंबईतील शन्मुखानंद हॉलमध्ये हा शो आयोजित करण्यात आला होता. हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. कारण, अमिताभ बच्चन तिथे आले होते. याचदरम्यान, तबस्सुम यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्या व्हिल चेअरवर बसून शो होस्ट करत होत्या. मात्र, त्यावेळी अचानक हॉलमध्ये आग लागली आणि सर्वत्र धूराचे लोट पसरले. त्यामुळे लोक घाबरून पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.
अमिताभ बच्चन यांनी वाचलेला अभिनेत्रीचा जीव
हॉलमध्ये आग लागल्याने लोक जीव वाचवण्यासाठी सैरा-वैरा पळू लागले. मात्र, तबस्सुम व्हिलचेअरवर बसून होत्या.पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्या मदतीसाठी ओरडत होत्या. पण, गर्दी आणि गोंगाटामुळे त्यांच्या आवाज कोणापर्यंत पोहोचेना. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तबस्सुम यांचे प्राण वाचवले. एका मुलाखतीत त्यांनी या प्रसंगाविषयी सांगितलं होतं.