"लोक कायमचं इतकी उथळ, खालच्या दर्जाची..." वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:10 IST2025-06-13T14:10:02+5:302025-06-13T14:10:19+5:30
मुलगी देवीच्या जन्मानंतर तिच्या शरीरात नैसर्गिक बदल झाले असून तिचं वजनही वाढलं आहे.

"लोक कायमचं इतकी उथळ, खालच्या दर्जाची..." वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर
Bipasha Basu Reply To Trolls: आपल्या अनोख्या अदांनी एकेकाळी बॉलिवूडचा पडदा गाजवणारी बिपाशा बासू हिचे आजही लाखो चाहते आहेत. बिपाशा बसू तिच्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नेहमीच फिट आणि अॅक्टिव्ह राहणारी बिपाशा सध्या मातृत्व अनुभवतेय. मुलगी देवीच्या जन्मानंतर तिच्या शरीरात नैसर्गिक बदल झाले असून तिचं वजनही वाढलं आहे. नुकतीच ती जिमच्या बाहेर स्पॉट झाली. त्यावेळी तिच्या लूकवरून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं गेलं. आता या ट्रोलिंगवर बिपाशाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
खरं तर मिस इंडिया श्वेता विजय नायरनं बिपाशाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात श्वेता म्हणाली की, "मुलाच्या जन्मानंतर महिलांच्या आयुष्यात आणि शरीरात अनेक बदल येतात. पण समाज अजूनही ते स्वीकारत नाही", असं म्हणत तिनं बिपाशाची बाजू घेतली. या व्हिडीओवर बिपाशानं कमेंट करत श्वेता विजय नायरचे आभार मानले.
बिपाशानं लिहलं, "तुझ्या या स्पष्ट शब्दांबद्दल धन्यवाद. आशा आहे की लोक कायमची इतकी उथळ आणि इतकी खालच्या दर्जाची राहणार नाहीत. आणि दररोज पार पाडणाऱ्या लाखो भूमिका ओळखून महिलांचं कौतुक केलं जाईल. मी एक अतिशय आत्मविश्वासू महिला आहे. जिला प्रेमळ जोडीदार आणि समजूतदार कुटुंब लाभलेलं आहे. मीम्स आणि ट्रोल्स मला कधीच परिभाषित करू शकत नाहीत... आणि त्यांनी मला घडवलंही नाही. मात्र समाजातील महिलांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं हे एक अतिशय दु:खद आणि चिंताजनक प्रतिबिंब आहे".
पुढे तिनं लिहलं, "माझ्या जागी दुसरी एखादी स्त्री असती, तर ती अशा घृणास्पद ट्रोलिंगमुळे आतून तुटून गेली असती. असो, अशाचप्रकारे जर अधिकाधिक ठाम आवाज उठले आणि निदान स्त्रियांनी एकमेकींना समजून घेतलं, एकमेकींचं कौतुक केलं, तर स्त्रिया अजून उंच भरारी घेतील. आपल्या कुणीही थांबूवू शकत नाही सख्यांनो", असं रोखठोक मत बिपाशानं मांडलं.