'बॉर्डर २'च्या गाण्यावर जावेद अख्तर यांची टीका, भूषण कुमार सडेतोड उत्तर देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:01 IST2026-01-22T13:00:47+5:302026-01-22T13:01:22+5:30
भूषण कुमार यांनी जावेद अख्तर यांना सडेतोड उत्तर दिलंय.

'बॉर्डर २'च्या गाण्यावर जावेद अख्तर यांची टीका, भूषण कुमार सडेतोड उत्तर देत म्हणाले...
१९९७ मधील आयकॉनिक 'बॉर्डर' चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'बॉर्डर २' उद्या २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 'बॉर्डर २' साठी गाणी लिहिण्यास जावेद अख्तर यांनी स्पष्ट नकार दिला असून, निर्मात्यांच्या सर्जनशीलतेवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. त्यांच्या टिकेनंतर भूषण कुमार यांनी जावेद अख्तर यांना सडेतोड उत्तर दिलंय.
मूळ 'बॉर्डर' चित्रपटातील सुपरहिट गाण्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या जावेद अख्तर यांनी सिक्वेलसाठी गाणी लिहण्यास नकार दिला. "मला चित्रपटासाठी लिहिण्यास सांगितले होते, पण मी नकार दिला. जुन्या हिट गाण्यांमध्ये थोडा बदल करून ती पुन्हा वापरणे, ही एक प्रकारची बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळखोरी आहे. नवीन आणि दर्जेदार गाणी बनवा, अन्यथा तुम्ही तशी गाणी बनवू शकत नाही हे मान्य करा",या शब्दात त्यांनी टिका केली.
जावेद अख्तर यांच्या या टीकेनंतर निर्माते भूषण कुमार यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 'संदेसे आते हैं' हे केवळ गाणे नसून ती चित्रपटाची ओळख आहे. भूषण कुमार म्हणाले, "बॉर्डर २ हा चित्रपट तीन गोष्टींशिवाय अपूर्ण आहे, चित्रपटाचे शीर्षक, सनी देओल आणि 'संदेसे आते हैं' हे गाणे. हे गाणे सिक्वेलमध्ये असणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते".
चित्रपटात १९७१ च्या युद्धातील वेगवेगळ्या शौर्यगाथा दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कथेच्या गरजेनुसार गाण्याचे बोल बदलण्यासाठी निर्मात्यांनी मनोज मुंतशिर यांची निवड केली. हे गाणे पहिल्या भागाची पुनर्निर्मिती नसून, सैनिकांच्या कथांवर आधारित आहे.
प्रेक्षकांचे आवडते गाणे 'घर कब आओगे' नवीन रूपात ऐकायला मिळणार आहे. या गाण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज गायक सोनू निगम, अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ, विशाल मिश्रा यांनी आपला आवाज दिला आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित हा चित्रपट उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.