१२ कोटींची गाडी खरेदी केली आणि १० मिनिटांनंतर लगेच झाला पश्चाताप, बादशाह म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:20 IST2026-01-27T13:19:19+5:302026-01-27T13:20:08+5:30
१२ कोटींची गाडी अन् १० मिनिटांचा आनंद! रोल्स रॉयस खरेदी केल्यावर रॅपर बादशाहला पश्चाताप; म्हणाला, "तो निर्णय चुकला..."

१२ कोटींची गाडी खरेदी केली आणि १० मिनिटांनंतर लगेच झाला पश्चाताप, बादशाह म्हणाला...
Badshah Rolls Royce Cullinan : लक्झरी गाड्या, महागडी घड्याळं आणि ब्रँडेड स्नीकर्सचा शौकीन असलेल्या बादशाहने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 'रोल्स-रॉयस कलिनन सीरीज II' (Rolls-Royce Cullinan Series II) ही आलिशान कार खरेदी केली होती. मात्र, आता ही कार घेण्याचा निर्णय घाईघाईत घेतल्याचे त्याने मान्य केले आहे.
'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत बादशाहने त्याच्या या महागड्या छंदाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. तो म्हणाला, "मला वाटतं की मी ती गाडी खरेदी करण्याचा निर्णय खूप घाईत घेतला. ज्या दिवशी ठरवलं त्याच दिवशी ती घेतली. कार नक्कीच उत्कृष्ट आहे आणि ती घेतल्यावर सुरुवातीला राजासारखं वाटलं. पण तो आनंद फक्त १०-१५ मिनिटंच टिकला. त्यानंतर मला वाटलं, आता पुढे काय? एवढी महागडी गाडी घेऊन काय साध्य झालं".
रोल्स-रॉयस कलिनन सीरीज II ही कार भारतात मोजक्याच लोकांकडे आहे. यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांचा समावेश होतो. शाहरुखकडे या कारचे जुने मॉडेल असून बादशाहने खरेदी केलेले मॉडेल हे अद्ययावत आहे. भारतात या कारची किंमत १२ ते १५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
महागड्या गाड्या का खरेदी करतो?
सतत नवनवीन गाड्या खरेदी करण्याच्या छंदावर विचारले असता बादशाह म्हणाला, "मला सर्वोत्तम तंत्रज्ञान अनुभवायची आवड आहे. जेव्हा लोक म्हणतात की ही जगातील सर्वोत्तम कार आहे, तेव्हा ती अनुभवण्याची माझी इच्छा असते. म्हणूनच मी अशा गाड्या खरेदी करतो".