रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:03 PM2024-01-19T13:03:15+5:302024-01-19T13:03:48+5:30

Arun govil: 'रामायण'मुळे अरुण गोवील यांना जितकी प्रसिद्धी मिळाली. तितकाच तोटाही सहन करावा लागला.

arun-govil-played-ram-in ramayan-but-this-role-became-curse-for-his-career-and-could-not-get-any-work-for-14-years | रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात

रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात

सध्या सगळ्या देशभरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरु आहे. २२ तारखेला आयोध्येमध्ये राम मंदिरात श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातील अनेक मान्यवर व्यक्ती आयोध्येमध्ये पोहोचले आहेत. यात १९८७ साली प्रसारित झालेल्या रामायण या गाजलेल्या मालिकेतील कलाकारही पोहोचले आहेत. इतकंच नाही तर हे कलाकार सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्येच रामायण मालिकेत प्रभू रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोवील यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळावर भाष्य केलं आहे.

१९८७ मध्ये दूरदर्शनवर रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेने देशभरात तुफान लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक आजही देवासमान मानतात. परंतु, या मालिकेमुळे या कलाकार मंडळींना जितकी लोकप्रियता मिळवली. तितकाच त्यांचा तोटाही झाला. कारण, या मालिकेनंतर अरुण गोवील यांना जवळपास १४ वर्ष काम मिळालं नव्हतं. त्यामुळे पडद्यावरील रामाला खऱ्या आयुष्यात खरोखर वनवास सहन करावा लागला होता.

२०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात पुन्हा पडद्यावर रामायण दाखवलं गेलं. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा रातोरात लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या मालिकेतील कलाकार मंडळी पुन्ही एकदा प्रकाशझोतात आले. यावेळी रामायणच्या संपूर्ण टीमने 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अरुण गोवील यांनी रामायणाच्या लोकप्रियतेनंतर त्यांना काम मिळणं कसं कठीण झालं होतं हे सांगितलं.

कामासाठी १४ वर्ष सहन करावा लागला वनवास

"अभिनेता म्हणून मी सिनेमापासून माझ्या करिअरची सुरुवात केली होती. पण, त्यानंतर काही काळाने मी छोट्या पडद्याकडे वळलो. मला रामानंद सागर यांनी रामायणमध्ये रामाची भूमिका ऑफर केली होती. ही भूमिका मिळाल्यामुळे मी खूप खूश होतो. या भूमिकेमुळे मला आयुष्यात खूप काही मिळालं. ही मालिका लोकांनी पाहिल्यानंतर माझी ओळख संपूर्ण देशभरात झाली होती", असं अरुण गोवील म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या मालिकेमुळे मी रातोरात स्टार झालो. फक्त देशातच नाही तर अन्य काही देशांमधूनही चाहते मला पत्र पाठवत होते. पण, बाजी तेव्हा पलटली ज्यावेळी या मालिकेनंतर कोणताही निर्माता मला काम देईनासा झाला. मी कधीही कोणत्या निर्मात्याकडे कामासाठी गेलो की, ते मला म्हणायचे, तुम्ही तर भगवान राम आहात. तुमची इमेज खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही सहकलाकाराची भूमिका देऊ शकत नाही. मला वाटलं काही दिवसांनी ही परिस्थिती बदलेलं. पण, तसं झालं नाही. जवळपास १४ वर्ष मी कामासाठी वणवण भटकत होतो. पण, मला काम मिळालं नाही."

दरम्यान, रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अरुण गोवील,दिपिका चिखलिया आणि सुनील लहरी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.

Web Title: arun-govil-played-ram-in ramayan-but-this-role-became-curse-for-his-career-and-could-not-get-any-work-for-14-years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.