अक्षय खन्नाच्या 'हलचल' सिनेमाच्या शूटिंगवेळेस अर्शद वारसीला झालेला मनस्ताप! काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:14 IST2025-12-29T15:11:23+5:302025-12-29T15:14:06+5:30
अर्शद वारसीला 'हलचल' सिनेमाचं शूटिंग करताना खूप त्रास झाला होता. काय घडलं होतं नेमकं?

अक्षय खन्नाच्या 'हलचल' सिनेमाच्या शूटिंगवेळेस अर्शद वारसीला झालेला मनस्ताप! काय होतं कारण?
अर्शद वारसी हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. 'सर्किट', 'जॉली' या अर्शदच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. भूमिकांमधून सर्वांना खळखळून हसवणारा अर्शद एका सिनेमाच्या सेटवर मात्र चांगलाच नाराज झाला होता. हा सिनेमा होता 'हलचल'. अक्षय खन्ना आणि करीना कपूर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका होती. अर्शदसोबत नेमकं काय घडलं होतं?
'हलचल'च्या सेटवर अर्शद नाराज, कारण...
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसीने हा खुलासा केला. जेव्हा सिनेमाची ऑफर अर्शदला मिळाली तेव्हा अर्शदला सांगण्यात आलं होतं की, 'हलचल'मध्ये त्याची भूमिका 'हेराफेरी'मध्ये अक्षय कुमारची जशी भूमिका होती तशी असेल. 'हलचल'चे कास्टिंग डायरेक्टर नीरज वोरा यांनी अर्शदला प्रियदर्शनचा सिनेमा आहे, असं सांगितलं.
प्रियदर्शनचा सिनेमा आणि 'हेराफेरी'मधल्या अक्षय कुमारसारखा रोल हे ऐकताच अर्शदने काहीही विचार न करता, 'हलचल' करायला होकार दिला. परंतु जेव्हा सिनेमाचं शूटिंग सुरु झालं तेव्हा अर्शदला डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ आली. जी भूमिका अर्शदला आधी सांगण्यात आली होती, तशी ती भूमिका नव्हती. तुम्ही दोघे मित्र आहात आणि तुम्ही फिल्ममधील हिरोचे मित्र आहात, या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे, असं अर्शद म्हणाला.
याशिवाय 'हलचल' सिनेमात अर्शद वारसीला जे कपडे दिले होते ते सुद्धा विचित्र होते. अर्शदला दिलेले कपडे प्रचंड मोठे होते. अशाप्रकारे अर्शदला 'हलचल'च्या शूटिंगवेळेस खूप त्रास झाला. तरीही कामाप्रती कमिटमेंट असल्याने अर्शदने 'हलचल'चं शूटिंग पूर्ण केलं. या सर्व प्रकारात दिग्दर्शक प्रियदर्शनची काहीच चूक नाही, कारण त्यांना याबद्दल काही माहित नव्हतं, असंही अर्शदने नमूद केलं. अर्शद लवकरच शाहरुखच्या 'किंग' सिनेमात झळकणार आहे.