अरिजीत सिंग इतिहास रचायला सज्ज! म्हणाला "मी फक्त एक सामान्य माणूस, जो गाणं गातो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:44 IST2025-05-28T14:41:43+5:302025-05-28T14:44:51+5:30
...म्हणून पहिला भारतीय कलाकार ठरणार अरिजीत सिंग!

अरिजीत सिंग इतिहास रचायला सज्ज! म्हणाला "मी फक्त एक सामान्य माणूस, जो गाणं गातो"
Arijit Singh Makes History: आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंग (Arijit Singh). त्याचं कोणतेही गाणे सहज ऐकलं तरी आपला मूडच बदलून जातो. बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणे त्याने दिली आहेत. या गायकाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अरिजित सिंगला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. आता अरिजीत इतिहास रचायला सज्ज झाला आहे.
अरिजीत सिंग हा पहिला भारतीय कलाकार ठरणार आहे, जो यूकेमधील एका मोठ्या स्टेडियममध्ये मुख्य कलाकार म्हणून सादरीकरण करेल. त्याचा कॉन्सर्ट येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी लंडनच्या प्रसिद्ध टॉटनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा कॉन्सर्ट ठरणार आहे.
आपल्या या ऐतिहासिक परफॉर्मन्सबाबत बोलताना अरिजीत म्हणाले, "मी फक्त एक सामान्य माणूस आहे जो गाणे गातो. लंडनमध्ये परत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर मी इतिहास रचणार असेल, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो".
अरिजीत हा सध्या Spotify वर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेला गायक असून त्यांनी टेलर स्विफ्ट, एड शीरन यांनाही मागे टाकलं आहे. आपल्या सुरेल आवाजानं तो कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करतो.