अनिल कपूरच्या गाजलेल्या 'नायक' सिनेमाचा सीक्वेल येणार? समोर आलं मोठं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:31 IST2026-01-04T14:14:32+5:302026-01-04T14:31:40+5:30
'नायक' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

अनिल कपूरच्या गाजलेल्या 'नायक' सिनेमाचा सीक्वेल येणार? समोर आलं मोठं अपडेट
बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'नायक'. अनिल कपूर, अमरिश पुरी, राणी मुखर्जी, परेश रावल अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक खिळून राहतात. आता याच चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
'नायक' हा चित्रपट अनिल कपूरच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूरनं 'नायक' चित्रपटाचे सर्व हक्क निर्माते दीपक मुकुट यांच्याकडून खरेदी केले आहेत. यामुळे आता 'नायक २' येणार असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कपूर या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि लवकरच यावर काम सुरू होऊ शकतं.
खूप कमी लोकांना माहिती आहे की, 'नायक' मधील मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर पहिली पसंत कधीच नव्हता. ही भूमिका आधी शाहरुख खान आणि आमिर खान यांना ऑफर झाली होती. पण त्यांनी नकार दिल्यानंतर अनिल कपूरनं ही भूमिका स्वीकारली आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक 'क्लासिक' चित्रपट ठरला.
दरम्यान, पुढील वर्षी 'नायक' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या २५ वर्षांत भारतीय राजकारण आणि समाजकारण खूप बदललं आहे. अशा परिस्थितीत, आजच्या काळातील 'शिवाजी गायकवाड' कसा असेल आणि तो भ्रष्टाचाराविरुद्ध कसा लढेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.