...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा
By देवेंद्र जाधव | Updated: June 9, 2025 13:46 IST2025-06-09T13:45:37+5:302025-06-09T13:46:17+5:30
अमृता सुभाषने गल्ली बॉय सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. हा सिनेमा अमृताने कसा मिळवला याची कहाणी रंजक आहे (amruta subhash)

...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा
अमृता सुभाष (amruta subhash) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृताने गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी इंडस्ट्रीतही तिच्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. 'सेक्रेड गेम्स २', 'लस्ट स्टोरीज २', 'सास-बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड', 'रमन राघव', 'धमाका' अशा सिनेमांमधून आणि वेबसीरिजमधून अमृताने चांगलीच छाप पाडली आहे. अमृताच्या आजवरच्या कारकीर्दीतील महत्वाचा सिनेमा म्हणजे गल्ली बॉय. या सिनेमात अमृताने रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. सिनेमातील एका सीनमुळे अमृताने हा सिनेमा स्वीकारला होता, असा खुलासा तिने केलाय.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अमृताने गल्ली बॉय सिनेमाविषयी सांगितलं. अमृता म्हणाली, "झोयाने मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा, ती मला सॉरी सॉरी म्हणाली. मी त्या भूमिकेसाठी खूप छोटी आहे असं तिला वाटत होतं. मग मी झोयाला नेमका काय रोल आहे ते विचारलं. त्यावर झोयाने मला गल्ली बॉय सिनेमाविषयी सांगितलं. या सिनेमात मी फिट बसणार नाही, असं तिला वाटत होतं. पण मी आत्मविश्वासाने तिला आधी स्क्रीप्ट द्यायला सांगितलं. मी तुला स्क्रीप्ट देते. पण नाही बोललीस तरी काही हरकत नाही. असं प्रेशरमध्ये येऊन नाही नको सांगूस. स्क्रीप्ट वाच आणि मग तुला जे चांगलं योग्य वाटेल ते कर, असं झोया मला म्हणाली."
"मी गल्ली बॉयची स्क्रीप्ट वाचली. त्यात एक वाक्य होतं, तुने कभी सोचा था, मुझे कैसे छुना है. धारावीत झोपडपट्टीत राहणारी एक स्त्री तिच्या पतीला मुलांसमोर ज्या पद्धतीने हे बोलते, हा मी विचार करुनच थक्क झाले. या अनुभवातून मला गेलं पाहिजे. हा संवाद मला बोलायचाच आहे. त्यामुळे इतर भीती मनातून निघून गेली. त्यामुळे काहीही झालं तरी तो सीन मला करायचा होता. त्यामुळे मी झोयाला होकार दिला की, मी करेन. तिलाही आनंद झाला." अमृता सुभाषचा नुकताच रिलीज झालेला 'जारण' हा मराठी सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.