अमृता सिंगच्या आईवर होता इंदिरा गांधी यांचा राग, काय घडलेलं नेमकं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:22 IST2026-02-10T12:21:59+5:302026-02-10T12:22:55+5:30
अमृता पेक्षाही सुंदर होती तिची आई, 'ग्लॅमर गर्ल' म्हणून होती ओळख, संजय गांधींच्या सांगण्यावरून १३,००० जणांची केलेली नसबंदी!

अमृता सिंगच्या आईवर होता इंदिरा गांधी यांचा राग, काय घडलेलं नेमकं?
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अमृता सिंगने काल आपला ६८ वा वाढदिवस साजरा केला. ८० आणि ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चंदेरी दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. सैफ अली खानसोबतचे लग्न आणि त्यानंतर झालेला घटस्फोट यापेक्षाही एका गोष्टीने अमृताला सर्वाधिक मानसिक त्रास दिला, तो म्हणजे तिची आई रुखसाना सुलताना यांचे निधन. अमृताची आई रुखसाना सुलताना ही आणीबाणीच्या काळातील अशा काही शक्तिशाली नावांपैकी एक होत्या.
रुखसाना सुलताना या केवळ दिसायला सुंदर होत्या असे नाही, तर त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे कणखर होते. आणीबाणीच्या काळात त्या संजय गांधी यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी मानल्या जात. त्यांना त्या काळी 'चीफ ग्लॅमर गर्ल' म्हणून ओळखले जाई. गडद लाल लिपस्टिक आणि महागड्या सनग्लासेसची आवड असणाऱ्या रुखसाना यांच्या नावाने त्यावेळी जुन्या दिल्लीतील लोकांच्या अंगावर काटा उभा राहायचा.
१९७५ मध्ये देशात आणीबाणी लागली, तेव्हा रुखसाना सुलताना यांना एक मोठी जबाबदारी दिली गेली, असं बोललं जातं. संजय गांधी यांच्या नसबंदी शिबिराची रुखसाना यांना मोठी जबाबदारी दिली होती. त्यांना ८००० लोकांची नसबंदी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं होतं. पण रुखसाना यांनी खूप जास्त काम केलं. त्यांनी ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त, म्हणजे १३,००० पेक्षा जास्त लोकांची नसबंदी केली. त्या संजय गांधींच्या खूप जवळच्या होत्या असे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार केवळ काँग्रेस नेतेच नाही तर संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी, इंदिरा गांधी आणि युवा काँग्रेस अध्यक्षा अंबिका यांसारख्या अनेकांना रुखसाना खटकू लागल्या होत्या.
रुखसाना सुलताना यांनी लष्करी अधिकारी शिविंदर सिंग (प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांचे पुतणे) यांच्याशी विवाह केला होता. अमृता सिंग ही त्यांचीच कन्या. अमृताने १९९१ मध्ये स्वतःपेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले. मात्र, २००४ मध्ये १३ वर्षांचा संसार मोडल्यानंतर अमृताने मुलांच्या (सारा आणि इब्राहिम) संगोपनासाठी अभिनयातून ब्रेक घेतला.