लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहत होते सैफ-अमृता, लग्नानंतर अभिनेत्रीनं नावदेखील बदललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:54 IST2025-10-01T17:53:47+5:302025-10-01T17:54:39+5:30
अमृता सिंगने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी त्या दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर होते.

लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहत होते सैफ-अमृता, लग्नानंतर अभिनेत्रीनं नावदेखील बदललं
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या लग्नाची आणि घटस्फोटाची चर्चा आजही मोठ्या प्रमाणात होते. १९९१ मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. मात्र, त्यांचं लग्न टिकू शकलं नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का, लग्नापुर्वी सैफ आणि अमृता हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांनी कुटुंबाला न सांगता गुपचूप लग्न केलं होतं. या दोघांच्या सिक्रेट लग्नाबद्ल ज्येष्ठ डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी एका मुलाखतीत भाष्य केलंय.
नम्रता झकारिया यांच्याशी बोलताना अबू जानी आणि संदीप खोसला म्हणाले, "आम्ही साक्षीदार म्हणून त्यांच्या निकाहनाम्यावर स्वाक्षरी केली. एके दिवशी ते आमच्याकडे आले आणि म्हणाले की त्यांना लग्न करायचे आहे. ते दोघे प्रेमात होते आणि जवळपास ६ ते ८ महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. सैफ लग्नासाठी तयार होता, पण अमृता मात्र संकोचलेल्या अवस्थेत होती".
सैफ आणि अमृता यांचे लग्न कसे झाले, याचा किस्सा सांगताना ते म्हणाले, "आम्ही एका मौलवीला बोलावले. एक सरदारजी पंडित देखील उपस्थित होता. वेळ नसल्यामुळे अमृताने तिच्याकडे जे उपलब्ध होते, ते घालून तयारी केली. नशीब चांगले म्हणून तिच्या आईने तिला काही चांगले दागिने दिले होते. सैफने पारंपरिक भारतीय ड्रेस परिधान केला होता". तसेच या लग्नानंतर अमृताने आपले नाव बदलून 'अजीजा' ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सैफनं अमृताशी लग्न केलं, तेव्हा ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सुरुवातीला ते दोघेही आनंदात होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सैफबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंह ही एकटी पडली होती. दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिने एकटीने उचलली होती. अमृता सिंहने घटस्फोटाचे कारण उघडपणे कधीच सांगितले नाही.