'जलसा'च्या गेटवर चाहत्यांची निराशा, अमिताभ बच्चन यांनी मोडली अनेक वर्षांची परंपरा; 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:54 IST2026-02-23T13:53:58+5:302026-02-23T13:54:52+5:30
अमिताभ बच्चन यांची दर रविवारी मुंबईतील 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा १९८२ पासून सुरू झाली.

'जलसा'च्या गेटवर चाहत्यांची निराशा, अमिताभ बच्चन यांनी मोडली अनेक वर्षांची परंपरा; 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या चाहत्यांमधील नाते अतुट आहे. दर रविवारी आपल्या 'जलसा' निवासस्थानाबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांना भेटण्याची बिग बींची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र, नुकत्याच गेलेल्या रविवारी (२२ फेब्रुवारी) ही परंपरा खंडित झाली आणि जलसाच्या गेटवर महानायकाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. अमिताभ बच्चन यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
अमिताभ बच्चन केवळ इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरच नव्हे, तर 'टम्बलर' (Tumblr) या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहेत. आपल्या ताज्या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना न भेटू शकल्याबद्दल खंत व्यक्त केली. बिग बींनी लिहिले की, "कामाचा उत्साह जोरात सुरू आहे... पण, एक 'पण' येतोच... आणि दिवस संपतो... पण दिवसअखेर थोडा ब्रेक घेण्याची गरज भासतेय. या रविवारी मी 'जलसा'च्या गेटवर येऊ शकणार नाही, याचं मला मनापासून दुःख आहे. त्यामुळे प्रवासासाठी ऊर्जा साठवून ठेवा, आपण लवकरच भेटू. तोपर्यंत विचारांच्या आणि कल्पनांच्या शांततेत...".
का तुटली परंपरा?
बिग बींच्या या पोस्टवरून असे स्पष्ट होत आहे की, ते सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कामात अत्यंत व्यग्र आहेत. कामाच्या ओझ्यामुळे आणि सततच्या शुटिंगच्या वेळापत्रकामुळे त्यांना या रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी वेळ काढता आला नाही.
अमिताभ बच्चन यांची दर रविवारी मुंबईतील 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा १९८२ पासून सुरू झाली. 'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या गंभीर दुखापतीनंतर, सप्टेंबर १९८२ मध्ये ते हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर चाहत्यांचे प्रेम पाहून त्यांनी ही परंपरा सुरू केली. दर रविवारी अमिताभ बच्चन अनवाणी पायाने जलसाच्या बाहेर येतात आणि हात उंचावून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. या भेटीचे फोटो ते न विसरता सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, २२ फेब्रुवारीचा रविवार याला अपवाद ठरला. तरी बिग बींनी 'लवकरच भेटू' असे आश्वासन दिल्याने चाहत्यांना आता पुढच्या रविवारची प्रतीक्षा आहे.