अखेर आलिया-शर्वरीच्या अॅक्शन थ्रिलर 'अल्फा'ची रिलीज डेट जाहीर! 'या' तारखेला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:41 IST2026-03-09T12:39:38+5:302026-03-09T12:41:17+5:30
यश राज फिल्म्सने बहुप्रतिक्षित स्पाय अॅक्शन चित्रपट 'अल्फा'च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.

अखेर आलिया-शर्वरीच्या अॅक्शन थ्रिलर 'अल्फा'ची रिलीज डेट जाहीर! 'या' तारखेला होणार प्रदर्शित
सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत स्पाय-अॅक्शन चित्रपटांची लाट आली आहे. एकीकडे अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटाची प्रचंड चर्चा असून, त्याचे अॅक्शन सीन्स आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, या अॅक्शनच्या शर्यतीत आता बॉलिवूडचे सर्वात मोठे स्पाय-युनिव्हर्स म्हणजेच यश राज फिल्म्स (YRF) देखील मागे नाही. यश राज फिल्म्सने आपल्या बहुप्रतिक्षित स्पाय अॅक्शन चित्रपट 'अल्फा' (Alpha) च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
YRF ने आज (९ मार्च २०२६) अधिकृत घोषणा केली आहे की, 'अल्फा' हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. सुरुवातीला हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र 'बॅटल ऑफ गलवान' आणि 'धमाल ४' सारख्या मोठ्या चित्रपटांच्या क्लॅशमुळे निर्मात्यांनी आता जुलै महिन्याची निवड केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे टीझर पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले असून त्यामध्ये अभिनेत्री आलिया भट हिचा दमदार आणि आक्रमक अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.
'अल्फा' या चित्रपटात आलियासोबत मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा एक थरारक अॅक्शन-थ्रिलर असून त्यामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांचा सामना बॉबी देओलसोबत होणार असून हा संघर्ष अत्यंत तीव्र आणि दमदार असणार असल्याचे सांगितले जाते.
स्पाय युनिव्हर्सचा ७ वा भाग
विशेष म्हणजे, 'एक था टायगर', 'वॉर' आणि 'पठाण' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर 'अल्फा' हा YRF स्पाय युनिव्हर्समधील ७ वा चित्रपट असणार आहे. याआधी 'वॉर २' च्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये 'अल्फा'ची थोडीशी झलक दाखवण्यात आली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली होती. 'अल्फा' हा आलिया भट हिचा यश राज फिल्म्स सोबतचा पहिलाच चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. त्यांनी याआधी 'द रेल्वे मेन: द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाळ १९८४' ही लोकप्रिय वेब सिरीज दिग्दर्शित केली होती.