'धुरंधर' गाजतोय, पण अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावानं अद्याप पाहिला नाही, कारण सांगत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:50 IST2026-01-05T14:20:01+5:302026-01-05T14:50:57+5:30
राहुल खन्नानं का पाहिला नाही भावाचा सुपरहिट सिनेमा? म्हणाला...

'धुरंधर' गाजतोय, पण अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावानं अद्याप पाहिला नाही, कारण सांगत म्हणाला...
Akshaye Khanna Dhurandhar : २०२५ हे वर्ष अभिनेता अक्षय खन्नासाठी खऱ्या अर्थाने खास ठरलं. २०२५ च्या सुरुवातीला 'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. त्यानंतर वर्ष अखेरीस 'धुरंधर'मध्ये 'रहेमान डकैत'ची भूमिका साकारत अक्षयने सर्वांना थक्क केलं. या चित्रपटातील "FA9LA" या गाण्यावर त्यानं केलेला डान्स तर तुफान व्हायरल झाला. त्याच्या अनोख्या स्टेप्स आणि स्वॅगची खूप चर्चा झाली. जगभरातील प्रेक्षकांनी अक्षय खन्नाचं कौतुक केलंय. पण, अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावानं अद्याप 'धुरंधर' पाहिला नाहीये.
अक्षयचा भाऊ राहुल खन्ना याने 'धुरंधर'च्या यशाबद्दल किंवा अक्षयच्या अभिनयाबद्दल एकही पोस्ट शेअर केली नाही. जेव्हा एखादा अभिनेता इतका व्हायरल होतो, तेव्हा त्याच्या भावाकडून होणारे कौतुक अपेक्षित असते. मात्र राहुलनं एकही पोस्ट न केल्यानं त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता यावर राहुलने मौन सोडले.
यावर २१ डिसेंबर रोजी 'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, "मी अजून तो चित्रपट पाहिलेला नाही. अक्षय मला तो कधी दाखवतोय याची मी वाट पाहतोय. पण तो जे काही परिधान करतो, त्यात तो देखणाच दिसतो. मला खात्री आहे की या भूमिकेतही तो अप्रतिम दिसत असेल", या शब्दात त्यानं भावाचं कौतुक केलं.

राहुलसोबतच्या नात्यावर अक्षय काय म्हणाला होता?
गेल्या काही वर्षांत अक्षय खन्नाने आपल्या भाऊ राहुलसोबतच्या नात्याबाबत फारसं सार्वजनिक बोलणं टाळलं आहे. २०१९ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याला, पालकांच्या निधनानंतर राहुलसोबतच्या नात्यात काही बदल झाला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षय म्हणाला होता की, "माझं भावासोबतचं नातं माझ्या आई-वडिलांपासून स्वतंत्र होतं. त्या अर्थाने त्यात काही बदल झालेला नाही. पण, कोणत्याही व्यक्तीसाठी जवळचं कुटुंब म्हणजे आई-वडील आणि भावंडं असतात. जेव्हा ते वर्तुळ लहान होतं, तेव्हा जे उरतं त्याला आपण अधिक जपण्याचा प्रयत्न करतो".