'वेलकम टू द जंगल'च्या सेटवरचा धमाल व्हिडीओ तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:46 IST2025-11-14T17:45:40+5:302025-11-14T17:46:03+5:30
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे.

'वेलकम टू द जंगल'च्या सेटवरचा धमाल व्हिडीओ तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या बहुचर्चित चित्रपट 'वेलकम टू द जंगल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरून समोर आलेला एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधले अनेक दिग्गज कलाकार एकत्र धमाल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे.
दिग्दर्शक अहमद खान सेटवर एका डान्स सीक्वेन्सची रिहर्सल करताना दिसत आहेत. पण, या रिहर्सलमध्ये अक्षय कुमारसोबत इतर कलाकारही दिसून आले. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार बासरी हातात घेऊन ती वाजवण्याचा अभिनय करताना दिसत आहे. दुसरीकडे, अभिनेता अर्शद वारसी ढोल वाजवत आहे. तर, अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या बासरी आणि ढोलच्या तालावर मनसोक्त नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर आणि तुषार कपूर या सेलिब्रिटींचीही झलक पाहायला मिळाली.
अक्षयचे आगामी चित्रपट कोणते?
'वेलकम टू द जंगल' व्यतिरिक्त अक्षय कुमार एकापाठोपाठ एक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो अलीकडेच 'जॉली एलएलबी ३' मध्ये दिसला होता. तसेच, त्याचा 'भूत बांगला' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच, तो अभिनेता सैफ अली खानसोबत 'हैवान' चित्रपटाचे चित्रीकरण देखील करत आहे.