अजय देवगण-आर. माधवनची जादू पुन्हा चालली! 'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:31 IST2025-11-15T10:28:28+5:302025-11-15T10:31:20+5:30
'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली असून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जाणून घ्या किती कमाई केली?

अजय देवगण-आर. माधवनची जादू पुन्हा चालली! 'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
बहुचर्चित हिंदी चित्रपट 'दे दे प्यार दे २' (De De Pyaar De 2) अखेर प्रदर्शित झाला असून, या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलंय. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि इतर कलाकारांची केमिस्ट्री आणि कॉमेडीने 'दे दे प्यार दे २' चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे आकर्षित केले आहे. जाणून घ्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले?
पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती?
चित्रपट व्यापार विश्लेषक sacnilk ने दिलेल्या अहवालानुसार, 'दे दे प्यार दे २' ने आपल्या रिलीजच्या पहिल्या दिवशी देशभरात ९.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही ओपनिंग पहिल्या भागाच्या तुलनेत जास्त मानली जात आहे. शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सकाळच्या शोपासूनच त्याला चांगली गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढली, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईला वेग मिळाला.
२०१७ मध्ये आलेल्या 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या लोकप्रियतेचा फायदा दुसऱ्या भागाला निश्चितच झाला आहे. तसेच, चित्रपटातील विनोदी संवाद आणि दिग्गज कलाकारांची जुगलबंदी यामुळे या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगली कमाई करता आली. २०२४ मध्ये आर.माधवन आणि अजय देवगणचा 'शैतान' चित्रपट रिलीज झाला होता. 'शैतान'ने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता 'शैतान'नंतर माधवन आणि अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे २' चित्रपटातही या दोघांची जोडी पसंत केली गेली आहे.
चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शनिवार-रविवारी आगामी दोन दिवसांत कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. 'दे दे प्यार दे २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.