विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा गोड व्हिडीओ चर्चेत, इन्फ्लुएंसर आदित्य मदीराजूला दिलं खास गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:05 IST2025-09-30T12:58:37+5:302025-09-30T13:05:23+5:30
'विश्वसुंदरी' ऐश्वर्या रायची जादू आजही कायम आहे.

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा गोड व्हिडीओ चर्चेत, इन्फ्लुएंसर आदित्य मदीराजूला दिलं खास गिफ्ट!
Aishwarya Rai Paris Fashion Week: 'विश्वसुंदरी' ऐश्वर्या रायची जादू आजही कायम आहे. सुंदर रुप, निळ्या डोळ्यांनी ती आजही चाहत्यांना प्रेमात पाडते. जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. अनेक वर्षांपासून तिचे चाहते तिच्यासाठी आजही तितकेच प्रामाणिक आहेत. नुकतंच ऐश्वर्या लेक पॅरिस फॅशन वीक'साठी पॅरिसमध्ये पोहोचली आहे. पॅरिसमधून ऐश्वर्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातच मेकअप कंटेंट क्रिएटर आदित्य मदिराजू याच्यासोबतचा तिचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
मेकअप आर्टिस्ट आणि डिजिटल क्रिएटर असलेल्या आदित्यने ऐश्वर्याला भेटल्याचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ऐश्वर्याने त्याला एक खास मेकअप प्रोडक्ट गिफ्ट केल्याच दिसलं. या व्हिडीओमध्ये आदित्यने ऐश्वर्याला एक अतिशय गोड गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की, ऐश्वर्या राय हीच त्याच्या लग्नाचे कारण आहे. त्याने स्पष्ट केले की, तो आणि त्याचा जोडीदार दोघेही ऐश्वर्याचे मोठे चाहते आहेत, ज्यामुळे त्यांच्या पहिल्या डेटवरच त्यांच्यात एक मजबूत नातं निर्माण झाला.
आदित्यने ऐश्वर्याला पती आणि मुलीचा फोटोही दाखवला, त्यावर ऐश्वर्याने आनंदाने प्रतिक्रिया दिली. हा व्हिडीओ शेअर करताना आदित्य मदिराजूने लिहिले, "आमच्या हृदयाची राणी. तुला भेटणे स्वप्नासारखे होते". आदित्य मदिराजू हे त्यांच्या समलिंगी विवाहामुळे चर्चेत आला होता. २०१९ मध्ये त्यांनी पारंपारिक हिंदू समारंभात अमित शाह यांच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगी आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आदित्यवर आणि ऐश्वर्यावर प्रेम व्यक्त केले आहे. एका चाहत्याने "हा असा क्षण आहे जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील" अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने "तुला ऐश्वर्याला भेटताना पाहून खूप आनंद झाला" असे म्हटले.
ऐश्वर्या कायमच आपल्या चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने वागते. मग भारतात असो किंवा परदेशात ती चाहत्यांना वेळ देते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्याने पॅरिस फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवला. पॅरिस फॅशन वीकदरम्यान ऐश्वर्याने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी तयार केलेल्या आकर्षक काळ्या पोशाखात रॅम्पवर वॉक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसंच तिचं वजनही आधीपेक्षा काही प्रमाणात घटलेलं दिसलं आहे. 'फॅशन वीक'मधील ऐश्वर्याचा लूक पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन II' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती आणि त्रिशा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.