ऐश्वर्या रायच्या मूडनुसार बदलतो तिच्या डोळ्यांचा रंग? दिग्दर्शकाने उघड केलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:55 IST2026-01-31T11:54:20+5:302026-01-31T11:55:22+5:30
ऐश्वर्याच्या डोळ्यांचा रंग स्थिर नसून तो तिच्या मूडनुसार बदलतो? जाणून घ्या...

ऐश्वर्या रायच्या मूडनुसार बदलतो तिच्या डोळ्यांचा रंग? दिग्दर्शकाने उघड केलं सत्य
जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या डोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ऐश्वर्याच्या डोळ्यांचा रंग स्थिर नसून तो तिच्या मूडनुसार बदलतो? ऐश्वर्याला ग्लॅमरच्या जगात पहिली मोठी संधी देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी हा रंजक खुलासा केला आहे.
१९९३ मधील त्या प्रसिद्ध पेप्सी जाहिरातीची आठवण सांगताना प्रल्हाद कक्कर म्हणाले की, त्यांना अशा एका चेहऱ्याचा शोध होता जो पाहताच 'जगाची गती ४ सेकंद थांबेल'. अनेक मुलींच्या ऑडिशननंतर त्यांची नजर आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका साध्या मुलीवर पडली. खांद्यावर बॅग, फाटलेली जीन्स आणि विस्कटलेले केस अशा अवतारातही ऐश्वर्याचं सौंदर्य प्रल्हाद यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्या एका जाहिरातीने ऐश्वर्याला रातोरात स्टार बनवलं. प्रल्हाद कक्कर सांगतात की, जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना ५,००० पेक्षा जास्त फोन कॉल्स फक्त त्या 'सुंदर डोळ्यांच्या' मुलीबद्दल विचारण्यासाठी आले होते. त्यानंतर ऐश्वर्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

प्रल्हाद कक्कर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ऐश्वर्याचे डोळे हेच तिचे सर्वात मोठे आकर्षण आहे. ते म्हणाले, "जेव्हा मी तिच्या डोळ्यांत पाहिलं, तेव्हा मला संपूर्ण विश्व दिसलं. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऐश्वर्याच्या मूडनुसार तिच्या डोळ्यांचा रंग बदलत असे. कधी ते राखाडी (Grey), कधी हिरवे (Green) तर कधी निळे (Blue) दिसायचे. तिच्या मनात चाललेल्या भावनांचा थेट परिणाम तिच्या डोळ्यांच्या रंगावर होत असे आणि हे पाहून मी मंत्रमुग्ध झालो".
५२ व्या वर्षीही सौंदर्याची जादू कायम
आज वयाच्या ५२ व्या वर्षीही ऐश्वर्या रायचे सौंदर्य तितकेच मनमोहक वाटते. अलीकडेच ती 'पोन्नियिन सेल्वन २' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. काळाच्या ओघात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, मात्र ऐश्वर्याच्या 'त्या' जादुई डोळ्यांची जागा कोणीही घेऊ शकलं नाही. दरम्यान, ऐश्वर्या रायनं एका मुलाखतीत आपल्या डोळ्यांच्या रंगांविषयी सांगितलं होतं. तिनं आपल्या डोळ्यांचा नेमका रंग कोणता हे त्या मुलाखतीत सांगताना ती म्हणाली होती,''ना निळा,ना हिरवा माझ्या डोळ्यांचा रंग नॅचरल ग्रीन आहे".