मैथिली ठाकूरनंतर आता मनोज वाजपेयी राजकारणात एन्ट्री करणार? अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:48 IST2025-10-17T10:47:13+5:302025-10-17T10:48:13+5:30
मनोज वाजपेयींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय

मैथिली ठाकूरनंतर आता मनोज वाजपेयी राजकारणात एन्ट्री करणार? अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अशातच अभिनेते मनोज बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकारणात प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. कारण सोशल मीडियावर मनोज वाजपेयींचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. अखेर मनोज यांनीच या व्हिडीओवर मौन सोडलंय. काय म्हणाले?
व्हायरल व्हिडीओवर मनोज यांनी सोडलं मौन
खरंतर व्हायरल झालेला हा व्हिडीओ फेक असल्याचं स्वतः मनोज यांनी सांगितलं. त्यांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत मनोज हे राष्ट्रीय जनता दल (RJD) या पक्षाला पाठिंबा दर्शवत असल्याचं दिसतंय. परंतु अभिनेत्याने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सध्या बिहारमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, मनोज वाजपेयी यांची एक एडिट केलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र ही क्लिप मनोज वाजपेयी यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका जाहिरातीची होती. ही जाहिरात ए़डिट करुन त्याला चुकीचा संदर्भ देण्यात आला.
या फेक व्हिडिओवर मनोज वाजपेयी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचं मत मांडलं आहे. मनोज म्हणाले की, "हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. ही काही वर्षांपूर्वी केलेल्या एका जाहिरातीचा गैरवापर केला गेला आहे. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही." त्यांनी जनतेला आवाहन केलं की, अशा बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नये आणि कोणताही व्हिडीओ त्याची सत्यता न तपासता पुढे शेअर करू नये. आजच्या डिजिटल युगात कोणाचीही प्रतिमा खराब करणे सोपं झालं आहे, त्यामुळे सत्य काय आहे हे ओळखणं प्रेक्षकांची जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे एकूणच मनोज वाजपेयींचा हा व्हिडीओ फेक असल्याचं स्पष्ट झालं आहे. मनोज वाजपेयींची भूमिका असलेला 'जुगनुमा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला. याशिवाय मनोज यांचा 'इन्स्पेक्टपर झेंडे' हा सिनेमा ओटीटीवर चांगलाच लोकप्रिय झाला.