"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:49 IST2025-12-31T14:46:51+5:302025-12-31T14:49:51+5:30
अचानक मानधन वाढवलं, ६ महिन्यांपर्यंत शूटिंग थांबवलं आणि सिनेमातूनही काढलं; बॉलिवूड दिग्दर्शकाचे अक्षय खन्नावर आरोप

"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
अक्षय खन्ना सध्या केवळ 'धुरंधर'मुळेच नव्हे तर 'दृश्यम ३' मुळेही चर्चेत आहे. 'धुरंधर'मुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर अक्षय खन्नाच्या डिमांड वाढल्या. त्यावरुन निर्मात्यांसोबत मतभेद झाल्याने शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच अभिनेत्याने दृश्यम ३मधून एक्झिट घेतली. अक्षयने 'दृश्यम ३'साठी अॅडव्हान्स पैसे घेतल्याचा आरोपही निर्माते कुमार मंगत यांनी केला आहे. 'सेक्शन ३७५' सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी कोणीही अक्षय खन्नासोबत काम करायला तयार नव्हतं तेव्हादेखील त्याला साथ दिल्याचा खुलासा कुमार मंगत यांनी केला आहे. तर आता 'सेक्शन ३७५' सिनेमाचे लेखक मनीष गुप्ता यांनीदेखील अक्षय खन्नावर आरोप केले आहेत.
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत मनीष यांनी सांगितलं की "२०१७मध्ये अक्षयने माझा सिनेमा 'सेक्शन ३७५' साइन केला होता. ज्याचं लेखन मी केलं होतं आणि दिग्दर्शनही करणार होतो. तर कुमार मंगत यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. अक्षयचं मानधन २ कोटी रुपये ठरवण्यात आलं होतं. २१ लाख रुपये अॅडव्हान्स घेऊन त्याने कॉन्ट्रॅक साइन केला होता. पण, नंतर त्याने ज्या तारखा आम्ही ठरवल्या होत्या. त्या द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या सिनेमासाठी दिल्या. आणि त्या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो लंडनला गेला. त्यामुळे आम्हाला ६ महिने शूटिंग पुढे ढकलावं लागलं".
"त्याच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अक्षय परत आला आणि त्याने मानधनात वाढ करत ३.५ कोटींची मागणी केली. त्यासोबतच त्याला सिनेमावरही पूर्ण कंट्रोल हवा होता. त्याला सगळं काही त्याच्या पद्धतीने करायचं होतं. पण, अभिनेत्यांच्या मनाप्रमाणे वागणारा आणि त्यांच्या पद्धतीने चालणारा दिग्दर्शक मी नाही. त्यामुळे मी अक्षय खन्नाला तेव्हा विरोध केला होता. अक्षय खन्नाचा अहंकार दुखावल्यामुळे त्याने निर्मात्यांवर दबाव आणून मला दिग्दर्शकाच्या पदावरुन काढून टाकलं आणि दुसरा दिग्दर्शक आणला. त्यासोबतच माझी स्क्रिप्ट आणि प्री प्रोडक्शनचं ड्राइव्ह ज्यावर मी तीन वर्ष काम करत होतो तेदेखील त्यांनी जप्त केलं", असंही त्यांनी पुढे सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "मी अक्षयला सांगितलं होतं की मी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मी निर्माता कुमार मंगत यांनाही नोटीस पाठवली होती. मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत असतानाच कोर्टाच्या बाहेर कुमार मंगत यांनी माझ्यासोबत बोलून हे प्रकरण मिटवलं. पण हास्यास्पद गोष्ट म्हणजे आज कुमार मंगत अक्षय खन्नाच्या या चुकीच्या वागणुकीची फळं भोगत आहेत. आता त्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे".