'दृश्यम ३' सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी आता झळकणार 'हा' अभिनेता; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:01 IST2025-12-27T11:00:22+5:302025-12-27T11:01:07+5:30
'दृश्यम ३'मध्ये आता अक्षय खन्नाच्या जागी ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे सिनेमात खरी रंगत निर्माण होणार आहे

'दृश्यम ३' सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी आता झळकणार 'हा' अभिनेता; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझी 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून 'दृश्यम ३'ची अधिकृत घोषणा करण्यात आली. तिसऱ्या भागातून अक्षय खन्नाने एक्झिट घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अक्षयच्या जागी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची 'दृश्यम ३'मध्ये एन्ट्री होणार आहे.
आता हा अभिनेता घेणार अक्षय खन्नाची जागा
'दृश्यम २' मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अक्षय खन्ना तिसऱ्या भागात नसेल. त्याच्या ऐवजी आता 'पाताल लोक' फेम अभिनेता जयदीप अहलावत हा साळगावकर कुटुंबाच्या अडचणी वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे.
अक्षय खन्नाच्या जागी आता जयदीप अहलावतची निवड करण्यात आली असून, तो एका अत्यंत महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जयदीपच्या एन्ट्रीमुळे 'दृश्यम ३' चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. जयदीप आणि अजय देवगण यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत. जयदीप जानेवारी २०२६ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.
वृत्तानुसार, अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' या चित्रपटातून बाहेर पडण्यामागे मानधनाशी संबंधित वाद असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळात अक्षयच्या चित्रपटांना मिळालेले यश आणि त्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, त्याने 'दृश्यम ३' साठी सुमारे २१ कोटी रुपयांची मागणी केली होती. निर्मात्यांच्या मते ही रक्कम त्यांच्या बजेटच्या पलीकडे होती.
याशिवाय, लुक आणि विग वापरण्यावरूनही अक्षय आणि निर्मात्यांमध्ये एकमत न झाल्याने अखेर त्याने या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर हे कलाकार आपल्या जुन्याच भूमिकांमध्ये दिसतील. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. साळगावकर कुटुंबाचे रहस्य आता कोणत्या वळणावर जाणार आणि जयदीप अहलावतच्या एन्ट्रीने ही कहाणी आणखी उत्कंठावर्धक कशी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.