'कॉलेजच्या आठवणी ते अभिनयातले बारकावे', मल्हार फेस्टमध्ये आदित्य रॉय कपूरचा विद्यार्थ्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:52 IST2025-08-16T19:51:25+5:302025-08-16T19:52:01+5:30
Malhar Fest 2025 : हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला पाहून विद्यार्थ्यांचा एकच जल्लोष, अभिनेत्याने शेअर केले अनेक किस्से

'कॉलेजच्या आठवणी ते अभिनयातले बारकावे', मल्हार फेस्टमध्ये आदित्य रॉय कपूरचा विद्यार्थ्यांशी संवाद
Malhar Fest 2025 : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) मोठा चाहतावर्ग आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरुण तरुणींचा तो आवडता अभिनेता आहे. मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालय सेंट झेवियर्समध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मल्हार फेस्टिवलची धूम आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मल्हार फेस्टिवल पार पडला. आज दुपारच्या सत्रता आदित्य रॉय कपूरने विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. त्याला पाहून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. आदित्य रॉय कपूर याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. यावेळी त्याने त्याच्या कॉलेजच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला.
कॉलेजचे दिवस आठवले
शाळा-कॉलेजच्या आठवणी या कायमच सर्वांच्या मनात घर करुन असतात. मग अगदी अनेक सेलिब्रिटींनीही सामान्यांप्रमाणेच त्यांचे कॉलेजचे दिवस एन्जॉय केलेले असतात. 'आशिकी २', 'ये जवानी है दिवानी' ते नुकताच आलेला 'मेट्रो-इन दिनो' या सिनेमांतून अभिनयाची छाप पाडणारा आणि आपल्या चार्मिंग लूकने सर्वांना घायाळ करणारा अभिनेता आदित्य रॉय कपूरने आज मल्हार फेस्टिवलमध्ये हजेरी लावली. त्याने विद्यार्थ्यांशी बोलताना कॉलेजच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, "मी २००३ साली सेंट झेवियर्स महाविद्यालयात आर्ट्समध्ये प्रवेश घेतला होता. मी इथे एकच वर्ष शिकायला होतो पण ते एक वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. तेव्हा मी सुद्धा मल्हार फेस्ट आयोजित करणाऱ्या कमिटीमध्ये होतो. कॉलेजचं कँटिन आणि तिथलं चिकन-चीज सँडवीच तर आहाहा..तसंच आम्ही मित्रांनी मिळून एक म्युझिक बँड काढला होता. मी त्यात गायचो. माझ्यात संगीताबद्दल आवड निर्माण झाली ती याच कॉलेजमुळे. त्यामुळे झेवियर्स चे आभार. नंतर एक वर्षांनी मी कॉलेज सोडलं आणि त्यामुळे बँडही सोडला. पण कॉलेजचे दिवस माझ्या कायम स्मरणात आहेत."
भूमिकांची निवड, अभिनयातील बारकावे याबद्दल
आदित्य रॉय कपूरला विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. भूमिकांची निवड कशी करतोस? गंभीर सीन्स नंतर स्वत: त्यातून कसा बाहेर येतोस? तरुणाई ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचं आहे त्यांना काय सल्ला देशील? या सगळ्यावर आदित्य म्हणाला, "अभिनय ही एक प्रक्रिया आहे. यात सातत्य असतं जे जमायला हवं. माझ्यासाठी भूमिकांची निवड करताना स्क्रिप्ट ही महत्वाची आहे. गोष्ट चांगली असेल तर मी होकार देतो. तसंच दिग्दर्शक कोण, निर्माता कोण हेही बघतो. मी सलमान खान, हृतिक रोशन यांच्यासोबत आधी काम केलं होतं. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आजही मी शिकतोच आहे. तसंच जितक्या आपण ऑडिशन देत जातो त्यातून बरंच शिकायला मिळतं. आपला सराव होत राहतो. त्यामुळे नवीन लोकांना हेच सांगेन की ऑडिशन देत राहा. ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही सातत्याने केलं तर तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल.