'धुरंधर'वरील व्हायरल मीम्सवर आदित्य धरनं दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:25 IST2026-03-13T15:06:12+5:302026-03-13T17:25:31+5:30
व्हायरल मीम्सवर आदित्य धरनं प्रतिक्रिया दिली आहे.

'धुरंधर'वरील व्हायरल मीम्सवर आदित्य धरनं दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला..
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून मोठं कौतुक मिळालं. विशेषतः चित्रपटातील बारकाईने केलेल्या डिटेलिंगमुळे आदित्य धरची प्रशंसा झाली. या संदर्भात सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. आता या व्हायरल मीम्सवर आदित्य धरनं प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य धरचा काल १२ मार्च रोजी वाढदिवस होता. आदित्य धरनं हा खास दिवस सेलिब्रेशनऐवजी आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात घालवला. यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक लांबलचक चिठ्ठी लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत. आदित्य म्हणाला, "तुमचे सर्व संदेश, ट्विट्स आणि 'आदित्य धरच्या अद्भुत डिटेलिंगबद्दल' असलेल्या त्या सर्व मीम्सनी मी खूप प्रभावित झालो आहे. तुम्ही माझ्या कामावर जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो".
पुढे तो म्हणाला, "या वर्षी मला एका गोष्टीची खात्री पटली आहे की, तुमची स्वप्ने कितीही मोठी असली तरी त्यांच्यावरचा विश्वास कधीही गमावू नका. पूर्ण प्रामाणिकपणे आणि आपले सर्वस्व अर्पण करून काम करा, हे विश्व तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईल". चित्रपट उद्योगात काहीही शाश्वत नसताना प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम हेच माझे सर्वस्व असल्याचे त्याने सांगितले. आदित्यची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
कधी प्रदर्शित होणार 'धुरंधर: द रिव्हेंज'?
'धुरंधर २: द रिव्हेंज' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच महिन्यात म्हणजेच १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, 'धुरंधर' आणि सध्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक आदित्य धरने केलेलं आहे. यापूर्वी आदित्यने दिग्दर्शित केलेला 'URI' सिनेमा सर्वत्र तुफान गाजला होता. यामध्ये अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली होती