Taapsee Pannu : "अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते"; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 18:30 IST2023-06-07T18:22:54+5:302023-06-07T18:30:40+5:30
Taapsee Pannu : तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.

Taapsee Pannu : "अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते"; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?"
तापसी पन्नूबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. यासाठी तिची खूप प्रशंसाही होते. तापसीला वाटते की, तिने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केलं जात नाही. प्रेक्षकांनी तिच्या कामाला दिलेल्या आदराबद्दल ती आभारी आहे, असं तापसी पन्नू म्हणते. पण, आता जेव्हाही तिचा नवीन चित्रपट येतो तेव्हा लोक फक्त 'पुन्हा एकदा तापसीने उत्तम काम केलं आहे' अशी कमेंट करतात.
अभिनेत्री म्हणते की, ज्या कलाकारांनी गेल्या काही काळापासून प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आहे. त्यांच्या कामगिरीला अनेकदा हलक्यात घेतलं जातं. ती म्हणते की, "प्रत्येक नवीन चित्रपटानंतर लोक म्हणतात, "तापसीने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आहे. 'माझ्या कामाचे कौतुक करणाऱ्यांची मी आभारी आहे. पण, जेव्हा लोक पुन्हा असंच म्हणतात तेव्हा अंदाज लावता येत नाही. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी मला किती मानसिक ताण सहन करावा लागतो याची तुम्ही कल्पना करू शकत नाही."
तापसी पुढे म्हणाली, "लोकांची पसंती, चित्रपटांचे प्रकार दर काही महिन्यांनी बदलतात. अशा परिस्थितीत अभिनयाचा स्तर राखणे कोणालाही अवघड असते. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेते. पहिल्यांदा प्रभाव पाडणे खूप सोपं आहे, कारण तेव्हा लोक तुमच्याकडून अपेक्षा करत नाहीत. पण, जेव्हा लोक अपेक्षा करू लागतात तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण करणे खरोखर कठीण असते."
अभिनेत्रीने 'सांड की आँख', 'थप्पड' आणि 'लूप लपेटा' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ती सध्या शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटासाठी तापसी खूप उत्सूक आहे. याबाबत तापसीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, 'राजू सर आणि शाहरुख खान सर.... दोघांचे कॉम्बिनेशन एकाच चित्रपटात असेल आणि जर मला बॅकग्राऊंडला एक झाड बनण्यास सांगितलं तरी मी ते नक्कीच करेन.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.