धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:06 IST2025-12-03T09:06:03+5:302025-12-03T09:06:30+5:30
Dharmendra Asthi Visarjan : बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ९ दिवसांनंतर त्यांचे अस्थी विसर्जन उत्तराखंडमधील हरिद्वार येथे होणार आहे. दिवंगत अभिनेत्याचे दोन्ही पुत्र, सनी देओल, बॉबी देओल आणि कुटुंबातील इतर सदस्य हरिद्वार येथे पोहोचले आहेत.

धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ९ दिवसांनंतर त्यांचे अस्थी विसर्जन उत्तराखंडमधील हरिद्वार येथे होणार आहे. दिवंगत अभिनेत्याचे दोन्ही पुत्र, सनी देओल, बॉबी देओल आणि कुटुंबातील इतर सदस्य हरिद्वार येथे पोहोचले असून ते हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. २ डिसेंबर रोजी अस्थी विसर्जन 'VIP घाटा'वर होणार होते, परंतु आता ते आज म्हणजेच ३ डिसेंबरसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी जगाचा निरोप घेतला. ते ८९ वर्षांचे होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र २४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तराखंडमधील हरिद्वार येथील VIP घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाईल. यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब आधीच तिथे उपस्थित आहे. मात्र, त्यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले आहे.
अंतिम दर्शन न ठेवण्यामागचं कारण आलं समोर
धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्कार खाजगी ठेवले होते. त्यामुळे चाहते किंवा सामान्य जनतेला त्यांना श्रद्धांजली देण्याची संधी मिळाली नाही. यावर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सांगितले की, शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची प्रकृती अत्यंत वेदनादायक होती. लोक त्यांना दुर्बळ किंवा आजारी अवस्थेत पाहू नयेत, अशी धर्मेंद्र यांची तीव्र इच्छा होती. त्यांना नेहमीच प्रतिष्ठापूर्ण निरोप हवा होता.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट
धर्मेंद्र यांना शेवटचं २०२४ मध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात पाहिले गेले होते. तसेच, त्यांनी 'इक्कीस' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. या चित्रपटात अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत हे देखील आहेत. हा चित्रपट याच महिन्यात २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये चाहते धर्मेंद्र यांना शेवटच्या वेळी पडद्यावर पाहू शकतील.