४००० कोटी बजेट असलेल्या ‘रामायण’ सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सुग्रीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:05 IST2025-08-19T17:03:42+5:302025-08-19T17:05:00+5:30
‘रामायण’ सिनेमात सुग्रीवाची भूमिका कोण साकारणार, याविषयी मोठा खुलासा झाला आहे. जाणून घ्या

४००० कोटी बजेट असलेल्या ‘रामायण’ सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सुग्रीव
निर्माते नितेश तिवारी यांचा आगामी आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘रामायण’ सतत चर्चेत आहे. चित्रपटाचे भव्य बजेट, कलाकारांची मोठी फौज अशा गोष्टींमुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण करत आहे. यात रणबीर कपूर भगवान रामाची, साई पल्लवी सीतेची, तर यश रावणाची भूमिका साकारत आहे. यासोबतच, आता या चित्रपटात सुग्रीवाची भूमिका कोण साकारणार, याचा खुलासा झालाय. प्रसिद्ध ओटीटी स्टार सिनेमात सुग्रीव म्हणून झळकणार आहे. जाणून घ्या कोण आहे तो?
हा अभिनेता साकारणार सुग्रीव
मीडिया रिपोर्टनुसार, लोकप्रिय अभिनेता अमित सियाल नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात सुग्रीवाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ओटीटीचा ‘किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित सियालला या चित्रपटात सुग्रीवाची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. या चित्रपटात सुग्रीवासारखी महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अमित सियालची निवड त्याच्या या वर्षातील दोन मोठ्या चित्रपटांतील दमदार अभिनयामुळे झाली आहे. ‘रेड २’ आणि ‘केसरी २’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अमित सियालने साकारलेल्या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्याची रामायणसाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय अमितला 'मिर्झापूर', ‘महारानी’ आणि ‘हंट’ सारख्या वेबसीरिजमधील अभिनयामुळे खूप चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामुळे आता ‘रामायण’ सिनेमातील सुग्रीवाच्या भूमिकेत अमित सियाल काय कमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ‘रामायण’च्या पहिल्या भागाचे शूटिंग सुरू असून, हा चित्रपट दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.