अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:30 IST2025-12-26T16:29:36+5:302025-12-26T16:30:49+5:30
Akshaye Khanna And Bobby Deol : दोन वर्षांपूर्वी रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटात 'अबरार हक'ची भूमिका साकारून बॉबी देओलने खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली. आता तोच धडा अक्षय खन्नाने गिरवला असून 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत' या भूमिकेने त्याला मुख्य नायकापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवून दिली आहे.

अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
चित्रपटसृष्टीत एक म्हण अत्यंत लोकप्रिय आहे, "फटा पोस्टर, निकला हीरो." पण बदलत्या काळानुसार या म्हणीत आता बदल करण्याची वेळ आली आहे. कारण आता पोस्टर फाडून हिरो नाही, तर एक जबरदस्त 'व्हिलन' बाहेर येत आहे. दोन वर्षांपूर्वी रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटात 'अबरार हक'ची भूमिका साकारून बॉबी देओलने खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली. आता तोच धडा अक्षय खन्नाने गिरवला असून 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत' या भूमिकेने त्याला मुख्य नायकापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवून दिली आहे.
विशेष म्हणजे जेव्हा बॉबी देओल आणि अक्षय खन्ना स्वतः मुख्य नायक म्हणून काम करायचे, तेव्हा त्यांना अशा प्रकारचे यश किंवा स्टारडम मिळाले नव्हते. अक्षय खन्नाने बॉबीच्या खूप आधी नकारात्मक भूमिका करण्यास सुरुवात केली होती. 'हमराज', 'रेस' आणि 'ढिशूम' सारख्या चित्रपटांनंतर तो एक कसलेला खलनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. २०२५ मध्ये 'छावा' आणि आता 'धुरंधर'च्या माध्यमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत 'सर्वोत्कृष्ट खलनायक' म्हणून आपली दावेदारी भक्कम केली आहे.
निगेटिव्ह भूमिकांनी दिली प्रसिद्धी
२००८ मधील 'रेस' नंतर अक्षय खन्ना एका मोठ्या हिटच्या शोधात होता, जे स्वप्न 'धुरंधर'ने पूर्ण केले आहे. वयाच्या ५० व्या वर्षी अक्षयने जे स्थान मिळवले आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रहमान डकैतच्या भूमिकेत त्याने जीव ओतला आहे. बॉबी देओलची कथाही काही वेगळी नाही. अनेक वर्षे फ्लॉप चित्रपटांचा सामना केल्यानंतर, २०२३ मध्ये 'अॅनिमल'मध्ये पहिल्यांदाच खलनायक बनून त्याने पडद्यावर धमाका केला. हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. आजही बॉबीच्या 'अबरार हक' या भूमिकेची चर्चा रंगते.
एन्ट्री सॉन्गचाही मोठा बोलबाला
ज्याप्रमाणे 'अॅनिमल'मध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीसाठी 'जमाल कुडू' या इराणी गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, अगदी तसाच प्रकार आता अक्षय खन्नाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 'धुरंधर'मधील अक्षयचे 'FA9LA' हे बहरीन गाणे सध्या संपूर्ण भारतात ट्रेंडिंगमध्ये नंबर १ वर आहे. आता केवळ हिरोसाठीच नाही, तर व्हिलनसाठीही विशेष गाणी तयार केली जातात आणि ती सुपरहिट ठरतात, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
जेव्हा 'रहमान' आणि 'अबरार' एकत्र आले होते...
एका बाजूला अक्षय खन्नाचा 'रहमान डकैत' आणि दुसऱ्या बाजूला बॉबी देओलचा 'अबरार हक' सध्या चर्चेत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या दोन्ही कलाकारांनी यापूर्वी एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'हमराज' आणि 'नकाब' यांसारख्या चित्रपटांत हे दोन दिग्गज कलाकार एकत्र दिसले होते. मात्र, आजच्या काळात दोघेही आपापल्या जागी बॉलिवूडचे सर्वात 'डेंजरस व्हिलन' म्हणून ओळखले जात आहेत.