"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए?...", भारत-पाक सीमेवर घुमला सनी देओलचा आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:49 IST2026-01-05T15:45:07+5:302026-01-05T15:49:55+5:30
"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए...", असं सनी देओलनं म्हणताच उपस्थितांनी आक्रमक वेशात "लाहोर तक" असा प्रतिसाद दिला आणि एकच उत्साह पाहायला मिळाला.

"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए?...", भारत-पाक सीमेवर घुमला सनी देओलचा आवाज!
'बॉर्डर-२' या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' गाणं राजस्थानच्या भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्यातील जवानांसोबत लॉन्च करण्यात आलं. यावेळी चित्रपटातील अभिनेता सनी देओलनं 'बॉर्डर' सिनेमातील आठवणींना उजाळा दिला. तसंच येऊ घातलेल्या सिक्वलमधील आपला एक खास डायलॉग दमदार आवाजात सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. "आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए...", असं सनी देओलनं म्हणताच उपस्थितांनी आक्रमक वेशात "लाहोर तक" असा प्रतिसाद दिला आणि एकच उत्साह पाहायला मिळाला.
९० च्या दशकात सुपरहिट ठरलेल्या 'बॉर्डर' सिनेमातील 'घर कब आओगे' गाणं देखील सुपरहिट ठरलं होतं. हे गाणं आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करुन आहे. आता 'बॉर्डर-२' च्या निमित्ताने हे गाणं पुन्हा एकदा नव्या दमात सादर करण्यात आलं आहे. लोंगेवाला सीमेवर भारतीय सैन्य दलातील जवानांच्या उपस्थितीत हे गाणं लॉन्च करण्यात आलं. यावेळी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सनी देओलनं 'बॉर्डर'च्या आठवणींना उजाळा दिला.
धर्मेंद्र यांच्यामुळे 'बॉर्डर' सिनेमा केला
सनी देओलनं त्याचे वडिल आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची आठवण सांगितली. "मी लहान असताना वडिलांचा 'हकीकत' सिनेमा पाहिला होता आणि तेव्हा मला तो खूप आवडला होता. पुढे जाऊन मी अभिनेता झाल्यावर अशाच पद्धतीचा देशभक्तीपर सिनेमा करेन असं ठरवलं होतं. याच विचाराने पुढे जे.पी.दत्ता यांच्यासोबत 'बॉर्डर' सिनेमाबाबत बोलणं झालं आणि सिनेमा बनला. त्यामुळे हा सिनेमा माझ्या खूप जवळचा राहिला आहे", असं सनी देओल म्हणाला.
भारतीय सैन्याने केला सन्मान
'घर कब आओगे' गाण्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारतीय सैन्य दलाच्यावतीनेही सिनेमातील कलाकारांचा आणि निर्मात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अभिनेता सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, गायक सोनू निगम यांच्यासह चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, निधी दत्ता तसेच सहनिर्माते शिव चनाना आणि बिनॉय गांधी यावेळी उपस्थित होते. अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर-२' सिनेमा येत्या २३ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.