गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:30 IST2025-08-05T12:24:28+5:302025-08-05T12:30:53+5:30
आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आहे. त्याने स्वतःची घरं असूनही मुंबईत भाड्याची घरं घेतली आहेत. आमिर या घरांसाठी मोठी किंमत मोजत आहे

गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा केवळ अभिनयातच नव्हे, तर संपत्तीच्या बाबतीतही बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. सध्या त्याच्याकडे सुमारे १८६२ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असूनही तो मुंबईत एका भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. या गोष्टीमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. आमिर खानचं दरमहा भाडं ऐकून थक्कच व्हाल.
आमिर खानचं दरमहा भाडं किती?
मुंबईच्या पाली हिल परिसरातील ‘विलनोमोना’ या उच्चभ्रू इमारतीमध्ये आमिर खान सध्या राहत आहे. विशेष म्हणजे त्याने या इमारतीत चार फ्लॅट्स भाड्याने घेतले असून ते सगळे एकत्र करून एक भव्य आणि आलिशान निवासस्थानी रूपांतरित करण्यात आले आहेत. या घरासाठी आमिर दरमहा २४.५ लाख रुपये भाडं भरतो आहे. इतकंच नव्हे तर, घर भाड्याने घेण्यासाठी त्याने १.४७ कोटी रुपये डिपॉझिट म्हणून दिले आहेत. हे घर त्याने पाच वर्षांच्या करारावर घेतले आहे.
आमिर खानने हे घर तात्पुरतं घेतलं आहे कारण त्याच्या मूळ वास्तूचं सध्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत तो या भाड्याच्या घरात राहणार आहे. विशेष म्हणजे, आमिर खानकडे आधीपासूनच मुंबईत १२ फ्लॅट्स आहेत. नुकताच त्याने पाली हिल भागात ‘बेला व्हिस्टा’ इमारतीमध्ये ९.७५ कोटींचा नवा फ्लॅट खरेदी केला आहे.
याच इमारतीत त्याचे आधीपासूनच ९ फ्लॅट्स आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडे पंचगणीमध्ये फार्महाऊस, लॉस एंजेलिसमध्ये व्हिला, आणि उत्तर प्रदेशातील शाहाबाद येथे २२ घरे आहेत. आमिर खानचा हा भाड्याचं घर घेण्याचा निर्णय त्याच्या राहत्या घराच्या डागडुजीसंदर्भात असून, काम पूर्ण झाल्यावर तो पुन्हा आपल्या मूळ घरात परतणार आहे.