"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:24 IST2025-12-30T14:23:34+5:302025-12-30T14:24:10+5:30
Aamir Khan And Imran Khan : आमिर खानबाबत त्याचा भाचा आणि अभिनेता इमरान खान याने एक धक्कादायक खुलासा केला आहे

"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या चित्रपटांसोबतच 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोच्या माध्यमातून देशातील अनेक गंभीर सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला. स्त्री भ्रूणहत्या, बाल लैंगिक शोषण, हुंडाबळी, जातीवाद आणि LGBTQ+ समुदायाचे प्रश्न अशा विषयांना त्याने वाचा फोडली. मात्र, याच शोमुळे आमिरला किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागला, याचा धक्कादायक खुलासा त्याचा भाचा आणि अभिनेता इमरान खान याने केला आहे.
समदीश भाटिया यांच्याशी संवाद साधताना इमरान खानने सांगितले की, '''सत्यमेव जयते'मधील विषयामुळे अनेक प्रभावशाली लोक आमिरवर नाराज झाले होते. तो म्हणाला, "हे तेच लोक होते जे समाजात सुरू असलेल्या वाईट प्रथांमध्ये सामील होते. त्यांना या शोमुळे होणारी चर्चा आवडली नाही. या लोकांनी शोचा निषेध केला आणि आमिरला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून त्याला देश सोडून पळून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
इमरानने पुढे सांगितले की, "मी माझ्या मामाला (आमिर खान) जवळून ओळखतो. तो जे काही करतो ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या हेतूने करतो. स्त्री भ्रूणहत्येवर आधारित एपिसोड प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोक प्रचंड संतापले होते. त्यावेळी त्याला गंभीर धमक्या मिळाल्या. 'गप्प राहा, जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझ्या घरावर येऊ आणि घर जाळून टाकू' अशा प्रकारचे संदेश देऊन त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला."
मुंबईत घर मिळवताना येणाऱ्या अडचणी
४२ वर्षीय इमरान खानने यावेळी स्वतःच्या अनुभवाबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, "मुंबईसारख्या शहरात माझ्यासाठी घर भाड्याने घेणे कठीण जाते. याला दोन कारणे आहेत एक म्हणजे माझी धार्मिक ओळख आणि दुसरे म्हणजे माझं करिअर. अनेक सोसायट्यांमध्ये चित्रपटसृष्टीतील लोकांना घर द्यायला नकार दिला जातो. माझी ओळख आणि माझा पेशा यामुळे मुंबईत घर शोधणे हे एक आव्हान असते."
'हॅप्पी पटेल'मधून इमरानचे कमबॅक
गेल्या दशकाभरापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला इमरान खान आता 'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. वीर दास दिग्दर्शित हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. यात प्रियांशु चटर्जी, मिथिला पालकर आणि शारिब हाशमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून संजय दत्त आणि श्रद्धा कपूर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.