फरहान अख्तरच्या '१२० बहादुर' सिनेमाला वीकेंडचा फायदा? केली 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:23 IST2025-11-24T10:22:06+5:302025-11-24T10:23:15+5:30
फरहान अख्तरच्या '१२० बहादुर' सिनेमाने शनिवार-रविवारच्या वीकेंडला किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर

फरहान अख्तरच्या '१२० बहादुर' सिनेमाला वीकेंडचा फायदा? केली 'इतक्या' कोटींची कमाई
अभिनेता फरहान अख्तरची भूमिका असलेला '१२० बहादूर' या बहुप्रतिक्षित चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनानंतर पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय वीकेंडला '१२० बहादूर' चित्रपटाला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळाला? जाणून घ्या.
'१२० बहादूर' सिनेमाची कमाई किती?
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, '१२० बहादूर'ने पहिल्या दिवशी (शुक्रवार) २.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी (शनिवार) कमाईत किरकोळ वाढ होत चित्रपटाने ३.८५ कोटी जमवले. वीकेंडचा महत्त्वाचा दिवस असलेल्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३.३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे, तीन दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे ९.४ कोटी इतके झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, '१२० बहादूर' या चित्रपटाचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये आहे. या मोठ्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाची वीकेंडची कमाई खूपच कमी असून, हा आकडा निराशाजनक आहे. चित्रपटासाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण तेव्हाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरणार की नाही, हे स्पष्ट होईल.
काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाच्या कथानकाचा विचार केल्यास, '१२० बहादूर'ची कथा १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धातील ऐतिहासिक 'रेझांग ला' लढाईवर आधारित आहे. या लढाईत भारतीय लष्कराच्या १३ कुमाऊं रेजिमेंटच्या जवळपास १२० शूर जवानांनी केवळ काही मीटरच्या चौकीचे रक्षण करताना अंदाजे ३,००० चीनी सैनिकांचा धैर्याने सामना केला होता.
फरहान अख्तरसोबत या चित्रपटात राशी खन्ना, विवान भतेना, एजाज खान, स्पर्श वालिया आणि अंकित सिवाच हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून, एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅप्पी स्टुडिओजने त्याची निर्मिती केली आहे.