बॉलीवूडनेही टाकला ‘सुटके’चा नि:श्वास
By Admin | Updated: December 11, 2015 02:15 IST2015-12-11T02:15:24+5:302015-12-11T02:15:24+5:30
२००२ पासून चालू असलेल्या हिट अँड रन खटल्यामधून अभिनेता सलमान खानची सुटका झाल्यावर, त्याच्या समवयस्क आणि इतर ज्येष्ठ अभिनेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बॉलीवूडनेही टाकला ‘सुटके’चा नि:श्वास
२००२ पासून चालू असलेल्या हिट अँड रन खटल्यामधून अभिनेता सलमान खानची सुटका झाल्यावर, त्याच्या समवयस्क आणि इतर ज्येष्ठ अभिनेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी टिष्ट्वटरवरून आनंद व्यक्त केला आहे.
सलमानचे अभिनंदन करण्यासाठी सर्वात प्रथम अनुपम खेर सरसावल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खेर म्हणाले, ‘सलमानची सुटका झाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. गेली तेरा वर्षे हा खटला चालू आहे. त्याचे कुटुंब इतकी वर्षे तणावाखाली होते. तो चांगला माणूस आहे. त्याला न्याय मिळायलाच हवा होता, पण याबरोबरच या घटनेत मृत्यू पावलेले, जखमी झालेल्या लोकांबद्दल मला अत्यंत वाईटही वाटते.’ अनुपम खेर आणि सलमान यांनी हम आपके है कौन, जब प्यार किसीसे होता है, नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रेम रतन धन पायो रे या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सलमानबरोबर नो एंट्री, दबंग, रेडी या चित्रपटांसाठी एकत्रित काम केलेल्या दिग्दर्शक अनीस बाझमी यांनीही आज न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला. बाझमी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘हा खटला अनेक वर्षे चालू होता. त्यामुळे हा निर्णय म्हणजे सलमान व त्याच्या कुटुंबसाठी मोठा दिलासा आहे. जर न्यायालय या निष्कर्षाप्रत पोहोचले असेल, तर न्यायालयाने सर्वांगीण मुद्द्यांचा विचार नक्कीच केला असेल. मला कायद्याबद्दल फारसे माहीत नाही (म्हणजे हा निर्णय योग्य की अयोग्य), पण न्यायालयापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. हा निर्णय म्हणजे सलमान व त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकरलाही वाटते. या सत्वपरीक्षेतून सलमान १३ वर्षे जात होता. ही सुटका म्हणजे त्याचे चाहते, फिल्म इंडस्ट्री, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासाठी मोठी बातमी आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अजून वाचलेली नाही, पण उच्च न्यायालयाला नक्कीच काही ठोस दिसले असणार आणि त्यांनी हा योग्य निर्णय दिला असेल. हा सलमानसाठी अत्यंत मोठा दिलासा आहे.
अभिनेते, दिग्दर्शकांबरोबर निर्मात्यांनीही सलमानचे अभिनंदन केले आहे. निर्माते मुकेश भट्ट यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘न्याय ही या देशात अत्यंत संदिग्ध संकल्पना आहे. न्याय हा कवितेचा एक सुंदर भागच आहे.’ सलमानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये
प्रमुख अभिनेत्रीचे काम करणाऱ्या धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणाली, ‘कोणाच्याही आयुष्यात काही चांगले होत असेल, तर मला आनंदच होतो.’ निर्माते सुभाष घई यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, ‘देव हा नेहमीच चांगल्या लोकांबरोबर असतो, १३ वर्षे डोक्यांवर टांगती तलवार वागविणाऱ्या सलमानची आज देवाच्या कृपेनेच सुटका झाली आहे.’ सलमानचा खटला उत्तमप्रकारे सांभाळल्याबद्दल
अशोक पंडित यांनी त्याच्या वकिलाचे अभिनंदन केले आहे. ‘सलमानचा आजवर पाणउतारा करणाऱ्या, त्याच्यावर झपाटल्यासारखी टीका करणारे लोक, आता त्याची व त्याच्या कुुटुंबाची माफी मागणार का?’ असा प्रश्न पंडित यांनी टिष्ट्वटरवर विचारला आहे.