छोट्या पडद्यावरची मोठी स्थित्यंतरे
By Admin | Updated: May 29, 2016 02:35 IST2016-05-29T02:34:39+5:302016-05-29T02:35:47+5:30
गेल्या उण्यापुऱ्या चार दशकांत भारतीय टेलिव्हिजनने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. १९९० पर्यंत दूरदर्शन देशातील एकमेव ब्रॉडकास्टर होतं. पुढे खासगी वाहिन्यांचा शिरकाव झाला

छोट्या पडद्यावरची मोठी स्थित्यंतरे
गेल्या उण्यापुऱ्या चार दशकांत भारतीय टेलिव्हिजनने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. १९९० पर्यंत दूरदर्शन देशातील एकमेव ब्रॉडकास्टर होतं. पुढे खासगी वाहिन्यांचा शिरकाव झाला आणि बघता बघता दूरदर्शनचं सुवर्णयुग संपलं. टेलिव्हिजनचा संपूर्ण चेहराच बदलला. इतका की आजघडीला टीव्ही उद्योग आणि बॉलीवूड यांचा समांतर प्रवास सुुरू झाला आहे. खासगी मनोरंजन वाहिन्यांचा शिरकाव भारतात झाला तसा ‘अमानत’, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’, ‘तारा’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कहानी घर घर की’ या फॅमिली ड्रामांनी घरातील गृहिणींना वेडेपिसे केले. भडक कथानक, भलंमोठ्ठं कुटुंब, या कुटुंबातील एक आदर्श सून आणि तिच्याविरुद्धची कटकारस्थानं अशा अंगावर येणाऱ्या या मालिका. या मालिकांमधील सगळेच भडक. भडक कथानक, भडक साड्या, भडक दागिने, भडक मेकअप, भडक कटकारस्थान. या मालिकांवर टीकाही झाली. पण गृहिणींनी या मालिकांना अपार प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांत अशाच मालिका टीव्हीवर दिसल्या. पण सुदैवाने सध्या मालिकांचा चेहरा बदलतोय. टीव्हीवरच्या मालिका अधिक वास्तववादी होताना दिसत आहेत. त्याचाच हा रंजक आढावा...
अधिक खंबीर ‘स्त्री पात्र’
सासवा, नणंदांची कटकारस्थानं सहन करीत, पती परमेश्वर मानणाऱ्या मालिकांमधील स्त्री पात्रांचा काळ जणू संपलायं. अनेक मालिका स्त्री पात्रांभोवती फिरताहेत. मालिकांमधील स्त्री पात्र अधिक करिअरिस्ट, आत्मनिर्भर दिसताहेत. ‘दिया और बाती’मधील संध्या,‘किती सांगायचयं मला’मधील अर्पिता, ‘मानसीचा चित्रकार’मधील तेजस्विनी, ‘अस्सं सासरं सुरेख बाई’मधली जान्हवी हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. विशेष म्हणजे, अनेक मालिकांमधील कुटुंबे घरातील महिलांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
वास्तवाची झालर
भरजरी साड्या, दागिने, मेकअप आणि कटकारस्थानं करणारी स्त्री पात्र हे मालिकांमधील चित्रही बदलत आहे. अनेक मालिकांमधील पात्र आता कॉमन मॅनचे प्रतिनिधित्व करणारे दिसू लागले आहेत. ‘दिया और बाती’मधली साधीभोळी संध्या, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’मधील देवची आई (सुप्रिया पिळगावकर), ‘काहे दिया परदेस’मधील गौरी यांची पात्रं अधिकाधिक रिअॅलिस्टिक झालेली दिसत आहेत. रिअॅलिटी पाहायला लोकांना आवडते, हे एव्हाना निर्माते-दिग्दर्शक व लेखकांना कळलेले आहे. कदाचित त्याचमुळे अलीकडे रिअॅलिटी शो ही अधिकाधिक रिअॅलिस्टिक थीमवर आधारित होत आहेत. पॉवर कपल, इंडियाज् गॉट टॅलेंट, वेगवेगळे डान्स शो यातील स्पर्धकांच्या लोकांना अपील होणाऱ्या स्टोरीज, हा त्याचाच परिपाक आहे.
रोमॅन्टिक ट्रॅक
मालिका बदलायला लागल्या आहेत. यातले बदल सहज लक्षात येण्यासारखे आहेत. कालपरवापर्यंत होम पॉलिटीक्सने बरबटलेल्या मालिकांमध्ये आता लव्ह, रोमान्स याअंगाने फुलत गेलेले प्रेम दिसू लागले आहे. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’,‘एक दुजे के वास्ते’,‘जाना ना दिल से दूर’ या काही रोमॅन्टिक हिंदी मालिका प्रेक्षकांना भावत आहेत. मराठीतही ‘काहे दिया परदेस’, ‘अस्स सासरं सुरेख बाई’ याही टोटल रोमॅन्टिक मालिका सध्या गाजत आहेत.
सकारात्मक कुटुंब
मालिकांमधील कुटुंबही बदलत आहे. घरच्या मुलीला सुनेला प्रोत्साहन देणार, संयुक्त कुटुंब पद्धतीचं सकारात्मक दर्शन घडवणारे कुटुंब मालिकांमध्ये दिसू लागले आहेत. अनेक मालिकांमध्ये कुटुंब लहान झालेली दिसत आहेत.
‘रिअॅलिटी’ अन् ‘कॉमेडी’
फॅमिली ड्रामा सुरू असताना टीव्हीवर अचानक रिअॅलिटी शोचे युग आले. कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोला अफाट पे्रक्षकवर्ग लागला. सारेगामा आणि यानंतर यानंतर एमटीव्ही रोडिज, राखीचे स्वयंवर, फिअर फॅक्टर, सच का सामना आणि इंडियाज आयडॉलचे पर्व आले. रिअॅलिटी कुठलीही असो ती लोकांना भावते, म्हणूनच रिअॅलिटी शोला पर्याय नाही, हे टीव्ही निर्माते, चॅनल सर्वांनाच कळून चुकले आहेत. त्यामुळे रिअॅलिटी शोच्या सीझनचे नवे पर्व टीव्हीवर सुरू झाले आहे. रिअॅलिटी शो प्रमाणेच कॉमेडी मालिका व शोही लोकांना आवडतात. म्हणूनन त्यावरही भर दिला जात आहे.
फ्लॅश बॅक
भारतीय टेलिव्हिजनने गेल्या काही दशकांत अनेक स्थित्यंतरे बघितीलीत. टीव्हीचे ते सुरुवातीचे दिवस आजही अनेकांच्या आठवणीत असतील. टीव्ही आणि पर्यायाने दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही आठवतात. यातील अभूतपूर्व आठवण म्हणजे रामानंद सागर लिखित व दिग्दर्शित ‘रामायण’ ही भव्य धार्मिक मालिका. ‘रामायण’, ‘महाभारत’ लागायचे त्याक्षणी रस्ते ओस पडायचे, हेही भारताने अनुभवले आहे. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ‘चित्रहार’, ‘छायागीत’,‘रंगोली’ ऐकताना लोक बेभान व्हायचे. १९८४ मध्ये प्रसारित मनोरंजनात्मक ‘हमलोग’ या मालिकेने सर्व रेकॉर्ड तोडले. यानंतर एकापेक्षा एक अशा शानदार मालिकांनी भारतीय प्रेक्षकांना वेड लावले. १९८० च्या दशकातील ,‘मालगुडी डेज ’,‘ ये जो है जिंदगी’, ‘नुक्कड’, ‘रजनी’, वाह जनाब’, ‘कच्ची धूप’,‘ब्योमकेश बख्शी’,‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, ‘देख भाई देख’.‘तहकीकात’ ‘सुरभी’,‘शांती’, ‘स्वाभीमान’, ‘विक्रम बेताल’, ‘कथासागर’ आदी मालिकांनी अपार लोकप्रीयता मिळवली. या मालिकांची सर कदाचित आजच्या कुठल्याही टीव्ही मालिकेला येणार नाही. म्हणूनच आजही या मालिका, त्यातील व्यक्तिरेखा भारतीय प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
- rupali.mudholkar@lokmat.com