भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:45 IST2025-11-10T15:45:12+5:302025-11-10T15:45:40+5:30
बैरागड परिसरात खुशबूची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर कासिम तिला चिरायू रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मॉडेल खुशबू अहिरवारचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिचे कुटुंब खुशबूला प्रेमाने खुशी म्हणत असे. तिच्या अचानक मृत्यूमुळे आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. खुशबूच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण खुशबूच्या आईने तिचा प्रियकर कासिम अहमदवर खुनाचे गंभीर आरोप केले आहेत.
खुशबूच्या आईने दावा केलाय की, कासिम अहमदने रात्री ११ वाजताच्या सुमारास मला फोन केला आणि खुशबूचे शरीर ताठ पडल्याचं सांगितले. तो तिला भोपाळमधील चिरायू रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जेव्हा त्यांनी खुशबूच्या शरीराची तपासणी केली तेव्हा त्यांना जखमा आणि मारहाणीच्या असंख्य खुणा दिसल्या. यामुळे खुशबूचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तिची हत्या करण्यात आली होती असा संशय कुटुंबाला आला. त्यांच्या मुलीसोबत लव्ह जिहाद झाला आहे असं कुटुंबाचे म्हणणं आहे.
पोस्टमोर्टम रिपोर्टमधून गूढ उकलणार
पोलिसांनी खुशबूचा मृतदेह ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शवविच्छेदन अहवालानंतरच खुशबूचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल. संशयित आरोपी कासिम अहमदचा इतिहास गुन्हेगारीचा आहे. त्याला यापूर्वी अवैध दारू व्यापारासाठी तुरुंगवास भोगावा लागला आहे. कासिमने खुशबूचा मोबाईल फोन ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी वापरला होता आणि दोघांमध्ये आर्थिक वाद होता. तपासादरम्यान पोलिसांना संशयास्पद व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत, ज्याची चौकशी सुरू आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. खुशबू आणि कासिम उज्जैनहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. बैरागड परिसरात खुशबूची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर कासिम तिला चिरायू रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांकडून आरोपीला अटक
रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ कारवाई केली आणि कासिम अहमदला अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे आणि पोलिस प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. पोलिस प्रत्येक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही आरोपीला अटक केली आहे आणि फॉरेन्सिक टीमला आवश्यक पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं डीएसपी दिव्या झरिया यांनी सांगितले.