कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकलेली हलकी-फुलकी लव्हस्टोरी, 'भूल चूक माफ' कसा आहे वाचा Review
By संजय घावरे | Updated: May 27, 2025 14:58 IST2025-05-27T14:58:05+5:302025-05-27T14:58:40+5:30
कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकलेल्या एका तरुणाची ही हलकी-फुलकी लव्हस्टोरी एक ना अनेक संदेश देणारी आहे.

कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकलेली हलकी-फुलकी लव्हस्टोरी, 'भूल चूक माफ' कसा आहे वाचा Review
'फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा...' हे श्रीमद्भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे सार कालातीत आहे. करण शर्मा दिग्दर्शित 'भूल चूक माफ' हा चित्रपटही याच वनलाईनवर आधारलेला आहे. कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकलेल्या एका तरुणाची ही हलकी-फुलकी लव्हस्टोरी एक ना अनेक संदेश देणारी आहे.
कथानक : बनारसमध्ये राहणारा बेरोजगार रंजन आणि देखणी तितली यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. लग्नासाठी घरातून पळालेल्या तितलीच्या मनात अचानक आपल्या मागे कुटुंबियांचे काय होईल? हा प्रश्न येतो. प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचते तेव्हा दोन महिन्यात रंजनला सरकारी नोकरी लागल्यास दोघांचे लग्न लावून देण्यास तितलीचे वडील तयार होतात. सरकारी नोकरी लागण्यासाठी रंजन खूप प्रयत्न करतो. पैसे देऊन का होईना, अखेर त्याला सरकारी नोकरी लागते. रंजन-तितलीचे लग्न ठरते. ३० तारखेला लग्न असल्याने २९ तारखेला रंजनला हळद लावली जाते. दुसऱ्या दिवशी रंजन सकाळी उठतो, तेव्हा पुन्हा २९ तारीख सुरू असते आणि घरी हळदीसाठी लगबग सुरू असते. दररोज तेच घडते. या २९ तारखेच्या चक्रव्यूहातून रंजन कसा बाहेर पडतो, त्याची रंजक कथा चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : पटकथेचा जीव फार मोठा नसला तरी फँटसी आणि वेगवेगळ्या नाट्यपूर्ण प्रसंगांच्या आधारे ती रंगवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका छोट्या शहरातील प्रेमकथा मोठ्या पडद्यावर आली आहे. छोट्या शहरांतील चालीरीती आणि प्रश्नही समोर आले आहेत. चित्रपटात बरेच संदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी कथा थोडी रेंगाळल्याने कंटाळा येतो, पण खुमासदार संवाद आणि नायक-नायिकेची केमिस्ट्री खिळवून ठेवते. तारखेच्या चक्रव्यूहात अडकलेला नायक कसा बाहेर पडेल? हे जाणण्याची उत्सुकता अखेरपर्यंत राहते. क्लायमॅक्स अत्यंत सकारात्मक असून, बरेच काही सांगणारा आहे. गीत-संगीत ठीक आहे. बनारसमधील लोकेशन्स कॅमेऱ्यात छान कैद केली गेली आहेत. चित्रपटाची गती काहीशी संथ वाटते. बनारसी बोलीभाषेकडे लक्ष देण्याची गरज होती. मध्यंतरापूर्वीचे काही क्षण खळखळून हसवतात.
अभिनय : कोणतीही भूमिका लीलया साकारण्याची कला राजकुमार रावच्या अंगी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याने साकारलेला रंजन विनोदाचे टायमिंग आणि इमोशनल रिअॅक्शनसाठी स्मरणात राहील. वामिका गब्बीने तितलीच्या व्यक्तिरेखेत नावाप्रमाणेच सुरेख रंग भरले आहेत. राजकुमारसोबत तिची केमिस्ट्री छान जमली आहे. सुरुवातीला निगेटीव्ह वाटणारे संजय मिश्रांचे कॅरेक्टर क्लायमॅक्समध्ये भलताच भाव खाऊन जाते. झाकीर हुसेन यांनी मुलीच्या वडीलांची, तर रघुबीर यादव यांनी मुलाच्या वडीलांची व्यक्तिरेखा आपल्या नेहमीच्या शैलीत साकारली आहे. सीमा पाहवा यांनीही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. इतर सर्वच कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, विनोदनिर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, बोलीभाषा
थोडक्यात काय तर बरेच सामाजिक संदेश देणारी ही एक हलकी-फुलकी लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने कुटुंबासह पाहण्याजोगी आहे. कुठेही अश्लीलतेचा स्पर्श नसलेला हा चित्रपट एकदा अवश्य पाहायला हवा.