अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:56 IST2025-07-20T14:55:55+5:302025-07-20T14:56:13+5:30
अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर चर्चेत आलेत.

अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर
Ashok Saraf Reuniting With Varsha Usgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar). या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. या जोडीने अनेक गाजलेले चित्रपट एकत्र केले आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तब्बल जवळपास १८ ते २० वर्षांनंतर हे दोन दिग्गज कलाकार पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नेमक्या कोणत्या प्रोजेक्टसाठी ते एकत्र येणार आहेत आणि त्यांची भूमिका काय असणार आहे, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृणाल साळुंखेने वर्षा उसगांवकर आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सेटवरील दिसून येत आहेत.
वर्षा उसगांवकर आणि अशोक ही जोडी चित्रपटामध्ये नाही तर मालिकेत पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा मा' मालिकेत वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत लवकरच मंगळागौरीचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. अशोक मामा यांच्या सुनेची पहिली मंगळागौर मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहेत. या खास भागात मंगळागौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्षा आणि मामांच्या मैत्रीण म्हणून दिसणार आहेत.
याविषयी वर्षा यांनी म्हटले की, "कलर्स मराठी माझ्यासाठी खूपचं लकी आहे असं मी म्हणेन. कारण. याआधी मी 'बिग बॉस मराठी'मधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि आता अशोक मा.मा. या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेत येणार आहे, त्यामुळे खूपच आनंद आहे. खास म्हणजे मी आणि अशोक सराफ छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. आम्ही दोघांनी मोठा पडदा तर गाजवला आहेच आणि आता छोटा पडदा देखील गाजवायला सज्ज आहोत".
त्यांनी पुढे म्हटले की, "मी आणि अशोक सराफ तब्बल १८ ते २० वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. अशोक सराफ एक महानट आहे. कारण त्याने अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहे, अतिशय अनुभवी आहे. त्याच्यासोबत काम करताना मला नेहेमीच काहीतरी नवीन सापडलं आहे. त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला सापडत गेले". दरम्यान, अशोक सराफ आणि वर्षा यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. हा विशेष भाग ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होईल.