कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 08:23 PM2024-04-27T20:23:19+5:302024-04-27T20:23:40+5:30

कवीमनाचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासोबतच आपल्या काव्यरचनेद्वारेही रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे.

Artist engaged in the election poem... | कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात...

कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - निवडणूका आणि मनोरंजन विश्वाचे नाते अतूट आहे. एकीकडे कलाकारांच्या उपस्थितीमुळे निवडणूकांच्या रॅलीला ग्लॅटर टच मिळत आहे, तर दुसरीकडे काही कलाकार निवडणूक आणि मतदानावर काव्य रचण्यात दंग आहेत.

कवीमनाचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासोबतच आपल्या काव्यरचनेद्वारेही रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. कोरोना काळात त्याने रचलेली पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकरी यांच्यावरील कविता तूफान लोकप्रिय झाली होती. संकर्षणने आता लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जनमानसाच्या मनातील भाव कवितेत शब्दबद्ध केला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित काही मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला 'मुक्केबाज' फेम विनीत कुमार सिंगनेही निवडणूक आणि मतदानावर काव्यरचना केली आहे. या कवितेत विनीतने मतदात्यांना आवाहन केले आहे. 

संकर्षणने आपल्या कवितेत एका कुटुंबाचे दु:ख मांडले आहे. 'सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या-पित्या घरचं तरी दु:खीच मला वाटलं...' अशी सुरूवात असलेली संकर्षणची कविता सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. यात त्याने कोणत्याही एकाच राजकीय पक्षाची बाजू न घेता जणू सर्व पक्षांबाबत मतदारांच्या मनात असलेली भावना व्यक्त केलीआहे. या कवितेबाबत 'लोकमत'शी बोलताना संकर्षण म्हणाला की, आपण आज जरी बातम्या बंद केल्या तरीही त्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात कायम सुरू असतात. समाजात काय घडत आहे ते बातम्यांमधून समजते. मी देखील बातम्या पाहातो. त्यातून मनात विचार आला की, एखाद्या कुटुंबात वेगवेगळ्या विचारधारेची वेगवेगळी माणसे असतील, तर त्यांच्या मनात काय घोळ सुरू असेल. याच विचारातून ही कविता सुचल्याचे संकर्षण म्हणाला.

विनीतने 'मतदान' असे शीर्षक असलेली कविता लिहिली आहे. 'ये जो शक्ती मिली है तुम्हें प्रभू, इसका तो कुछ सम्मान करो...' असे या कवितेचे सुरुवातीचे बोल आहेत. यात विनीतने मतदात्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत विनीत म्हणाला की, मी पूर्वीपासूनच लेखन करत आहे, पण अशाप्रकारे कविता लिहिण्याचा विचार कधी केला नव्हता. सर्वांनी मतदान करायला हवे असे मला वाटते. मतदान केल्यानंतरच कोणत्याही मुद्द्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो. मतदान न करता पाच वर्षे समाजातील समस्यांवर बोलणे बरोबर नाही. त्यातून ही कविता सुचली आहे. लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे. कोणालाही दोन मते देता येत नाहीत. तरीही कुठे ५०, तर कुठे ५५ टक्के मतदान होते. मतदानासाठी दिलेल्या सुट्टी दिवशी पिकनिकला जाणे चुकीचे आहे. हेच कवितेद्वारे सांगितले असल्याचे विनीत म्हणाला.

Web Title: Artist engaged in the election poem...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.