"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:21 IST2025-05-23T14:20:31+5:302025-05-23T14:21:27+5:30
अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..."
'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंताची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अपूर्वा करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अपूर्वाने नुकतंच जयंती वाघधरेच्या आम्ही असं ऐकलंय पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिने लग्नाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "माझा लग्नसंस्थेवर भयंकर विश्वास आहे. अनुभव घेण्यासाठी ही एक सुंदर गोष्ट आहे. पण, मला वाटतं की लग्न करायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात ते एक पॅकेजसारखं असतं. प्रेम, लॉयल्टी, हॉनेस्टी हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं तुम्ही देऊ शकता का? ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होईल की तुम्ही हे द्यायला आणि घ्यायला तयार आहात. तेव्हाच मला वाटतं एखाद्याने लग्न करावं".
"नाहीतर उगाचच सोसायटीचं प्रेशर आहे. आपल्या वयातले सगळेच लग्न करत्यात आणि दर वेळेला आपणच लग्न जाऊन अटेंड करतोय. तर आपलं लग्नही कोणीतरी अटेंड करावं म्हणून कोणी लग्न करू नये. आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपण हे देऊ शकतोय का? आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतोय का? हे जेव्हा कळेल तरच एखाद्याने उडी घ्यावी. कारण, त्यांच्याबरोबर बरेच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मी हे अनुभवलं आहे", असंही पुढे अपूर्वा म्हणाली.