अंदाज-ए-परिणिती
By Admin | Updated: July 27, 2016 02:56 IST2016-07-27T02:56:30+5:302016-07-27T02:56:30+5:30
परिणिती चोप्रा ही बॉलीवूडची गुणी अभिनेत्री. ‘ढिशूम’मधील ‘जानेमन आह...’ या गाण्यात वरुण धवनसोबतचा हॉट रोमान्स व किसिंग सीन यामुळे परिणिती सध्या चर्चेत आहे.

अंदाज-ए-परिणिती
परिणिती चोप्रा ही बॉलीवूडची गुणी अभिनेत्री. ‘ढिशूम’मधील ‘जानेमन आह...’ या गाण्यात वरुण धवनसोबतचा हॉट रोमान्स व किसिंग सीन यामुळे परिणिती सध्या चर्चेत आहे. याशिवाय आॅस्करविजेता चित्रपट निर्माता स्टीवन स्पिलबर्ग याच्या ‘दी बीएफजी’ या अॅनिमेटेड चित्रपटाला परिणिती आपला आवाज देणार असल्याने त्याचीही चर्चा आहे, पण सर्वाधिक चर्चा आहे, ती तिच्या वेट लॉसची. होय, काही किलो वजन कमी केल्यानंतर परिणिती अधिक सुंदर, आकर्षक दिसू लागली आहे. ‘अ न्यू पर्सन इन अ न्यू बॉडी,’ असे आम्ही नाही तर खुद्द परिणितीच म्हणतेय. परिणितीची सध्याची सेक्सी फिगर म्हणजे जीभेवर संपूर्ण ताबा, काटेकोर वेळापत्रक आणि जिममध्ये सतत दीड वर्ष गाळलेला घाम याचा परिणाम आहे. याच पार्श्वभूमीवर फिटनेस ते फिगर आणि वर्तमान ते भविष्यकाळातील प्रोजेक्ट आदींवर परिणितीने सीएनएक्सशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्याशी रंगलेल्या गप्पांचा हा सारांश खास आमच्या वाचकांसाठी...
स्टीवन स्पिलबर्गच्या ‘दी बीएफजी’ या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीला तू आपला आवाज देणार आहेस. हा अनुभव कसा वाटला?
- निश्चितपणे वेगळा अनुभव होता. हिंदी डबसाठी माझा आवाज देण्याआधी हा चित्रपट पाहण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि चित्रपट पाहिल्यानंतर मी अक्षरश: चित्रपटाच्या प्रेमातच पडले. तशीही स्टीवन स्पिलबर्गची मी खूप मोठी चाहती आहे. त्याच्या चित्रपटाचा भाग बनताना आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटले. मला केवळ माझ्या आवाजातून भावना व्यक्त करायच्या होत्या. निश्चितपणे हे आव्हानात्मक होते आणि हे करतानाचा अनुभव प्रचंड आनंददायी होता.
तुझ्या मेकओव्हरबद्दल काय सांगशील?
- हा बदल निश्चितपणे कठीण होता, पण आता तो तेवढाच समाधान देणारा ठरतो आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी मेकओव्हर महत्त्वपूर्णच होता. माझ्या दैनंदिन आयुष्यातील काही चुकीच्या सवयी, जिभेवर ताबा असे सगळे नवे व चांगले बदल स्वीकारण्याची हीच योग्य वेळ होती. केवळ आकर्षक फिगर नाही तर फिट राहण्यासाठी मी स्वत:ला बदलले, काही चांगल्या सवयी जाणीवपूर्वक स्वत:त रुजवल्या. यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले, पण यामुळे मला माझा नव्याने शोध लागला. माझ्या इच्छाशक्तीचा शोध मला घेता आला. खाण्याच्या सवयी बदलणे सोपे नाही, पण मी केले. यानंतरचे समाधान मी सध्या अनुभवते आहे.
अलीकडे तू वजन आणि फिगरबाबत बोलू लागली आहेस. अभिनयाच्या क्षेत्रात आकर्षक फिगर किती महत्त्वाची आहे?
- खूप महत्त्वाचे आहे. ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’मधील माझे गोलमटोल शरीर माझ्या भूमिकेला साजेसे होते. ‘इशकजादे’मध्येही मी जशी होते, अगदी तशीच फिट बसले. माझ्या मते, अभिनयात देहबोलीचा ८० टक्के वाटा असतो, पण मला ग्लॅमरस वा बोल्ड बिनधास्त अशा भूमिका साकारायच्या असतील, तर माझे शरीर तेवढेच आकर्षक असायला हवे. माझ्या मेकओव्हरनंतर एक अभिनेत्री म्हणून संधींची अनेक कवाडे माझ्यासाठी खुली झाली आहेत.
‘जानेमन’ची चर्चा जोरात आहे. वरुण धवनसोबतच्या या सुपरहिट गाण्याबाबत काय सांगशील?
- जाम मज्जा आली. शूट करताना मी खूप धम्माल केली. या गाण्यासाठी परफेक्ट लूक व एनर्जी कमावणे माझे लक्ष्य होते आणि व्हीडी (वरुण धवन)ने मला यात खूप मदत केली, त्यामुळे त्याचे आभार मानायलाच हवेत. जॉननेही मला काही टिप्स दिल्यात. एनर्जी लेवल वाढविण्यासाठी काय खावे, कधी खावे, कधी खाऊ नये, अशा अनेक टिप्सचे रिझल्ट तुम्हाला गाण्यात दिसत आहेत. शूटिंगदरम्यान मज्जाच आली. व्हीडी चांगला डान्सर आहे. त्याने मला खूप प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
आणि या गाण्यातील ‘गाजलेल्या किस’बद्दल काय सांगशील?
- (हसत हसत) ओह, ती तर पूर्णपणे व्हीडीची कल्पना होती. तो मला किस करणार, हे मलाही ठाऊक नव्हते. त्याने गाण्याच्या अखेरीस कॅमेरा आॅन असताना अचानक मला किस केले आणि मीच नाही तर सेटवरचे सगळेच आश्चर्यचकीत झालेत, पण नेमक्या त्याच शॉटची सगळ्यात जास्त चर्चा झाली. वरुणचा तो किस माझ्यासाठी नव्हता, तर त्याच्यावर जीव ओवाळणाऱ्या तरुणींसाठी होता.
या नव्या जनरेशनची अभिनेत्री म्हणून तू स्वत:कडे कशी बघतेस?
- नव्या पिढीची अभिनेत्री म्हणून माझ्याजवळ वेगवेगळ्या संधी आहेत. केवळ अभिनयच नाही, तर त्याशिवायही अनेक गोष्टी आजच्या अभिनेत्री करताहेत. फॅशन, सिंगिंग, सोशल वर्क, रिअॅलिटी शो, रायटिंग असे काय काय करण्याच्या संधी आहेत. विशेष म्हणजे, प्रेक्षकांनीही या वेगवेगळ्या भूमिकेत आम्हाला पसंती दिली आहे. माझ्या वयाच्या अभिनेत्रींकडे सध्या वेगवेगळ्या संधी आहेत, वेगवेगळी आव्हाने आहेत.
हा झाला चांगला भाग. वाईट भाग असलाच तर तो कोणता?
- निश्चितपणे चांगले, तसेच काही वाईटही असणारच. स्वत:च्या भावना मारून अनेकदा कॅमेऱ्यासमोर अभिनय करावा लागतो. मी अतिशय हळवी आहे. एखादे वेळी मन दु:खी असते, पण कॅमेऱ्यासमोर चेहऱ्यावर दु:खाची पुसट रेषाही दिसू देता येत नाही. कॅमेऱ्यापुढे अभिनय करता-करता खरे आयुष्यही ‘अभिनय’ बनून जाते, पण शेवटी हे काम आहे आणि माझे काम मला उत्तमपणे करायचे आहे, हेच खरे. त्यामुळेच इट्स ओके.
भावी आयुष्याकडे कशी बघतेस?
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम आरोग्यावर माझा भर राहणार आहे. कामाच्या बाबतीत म्हणाल, तर ‘ढिशूम’ आणि ‘बीएफजी’ एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यातील माझा वाटा फार मोठा नाही, पण तरीही मी या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. आयुष्यमान खुराणासोबतचा ‘मेरी प्यारी बिंदू’ लवकरच पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी सिंगर आहे आणि आयुष्यमान लेखक बनला आहे. या चित्रपटाकडूनही मला खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे. यानंतर यूएस ड्रीम टूर आहे. आम्ही अमेरिकेतल्या सहा शहरांमध्ये परफॉर्म करणार आहोत. मी स्टेज शो केलेला नाही. त्यामुळे मी यासाठीही कमालीची उत्सुक आहे.
- janhavi.samant@lokmat.com