राधिकाचा 'तो' व्हिडीओ लीक झाल्याने अनुराग कश्यप संतापला
By Admin | Updated: April 27, 2015 11:24 IST2015-04-27T11:11:02+5:302015-04-27T11:24:45+5:30
कसदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा बोल्ड दृश्य असलेला एका व्हिडीओ लीक झाल्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच संतापला आहे.

राधिकाचा 'तो' व्हिडीओ लीक झाल्याने अनुराग कश्यप संतापला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - कसदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा बोल्ड दृश्य असलेला व्हिडीओ लीक झाल्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच संतापला आहे. सत्यकथेवर आधारित एका शॉर्ट फिल्ममध्ये राधिकाने हा बोल्ड सीन दिला असून ही क्लिप लीक झाल्यानंतर अनुरागने थेट मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
अभिनेत्री राधिका आपटेची एक छोटी क्लिप सध्या वॉट्स अॅप व अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर झपाट्याने पसरत आहे. या व्हिडीओत राधिकाने न्यूड सीन दिला आहे. या व्हिडीओविषयी राधिकाने काहीच प्रतिक्रिया दिली नसली तरी अनुराग कश्यपने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या व्हिडीओविषयी मौन सोडले आहे. अनुराग म्हणतो, एका सत्यकथेवर मी २० मिनीटांची शॉर्ट फिल्म तयार केली असून ही शॉर्ट फिल्म मी लंडन येथे होणा-या चित्रपट महोत्सवासाठी पाठवली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कथेच्या मागणीनुसार राधिकाला हा बोल्ड सीन द्यायचा होता व तिने धाडस दाखवत हा सीन दिला होता. याचे चित्रीकरण असताना आम्ही फक्त महिलांनाच तिथे उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. मात्र कोणीतरी खोडसाळपणे हाच सीन लीक केल्याचा दावा अनुरागने केला आहे. राधिकाने माझ्यावर विश्वास दाखवत हा सीन शुट केला होता. पण दुर्दैवाने हा व्हिडीओ लीक झाल्याने राधिकाची खिल्ली उडवली जात आहे. या प्रकारासाठी मी स्वतःला जबाबदार धरत असून पोलिस आयुक्त राकेश मारियांकडेही मी तक्रार केली आहे असे त्याने सांगितले. ही क्लिप लीक करुन सोशल मिडीयावर पसरवणा-यांचा शोध लागेपर्यंत मी गप्प बसणार नाही अशी शपथच त्याने घेतली आहे.