पती-पत्नीच्या नात्यातील विसंवादाचा ‘अनुराग’
By Admin | Updated: March 2, 2016 02:04 IST2016-03-02T02:04:50+5:302016-03-02T02:04:50+5:30
आतापर्यंत पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारे अनेक चित्रपट येऊन गेले. पण पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ हा वेगळ्या धाटणीवर आधारित चित्रपट आहे.

पती-पत्नीच्या नात्यातील विसंवादाचा ‘अनुराग’
आतापर्यंत पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारे अनेक चित्रपट येऊन गेले. पण पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ हा वेगळ्या धाटणीवर आधारित चित्रपट आहे. लग्नानंतरच्या एका टप्प्यावर पती-पत्नीच्या नात्यात होणारी घुसमट, त्यावर त्यांनी काढलेला मार्ग, असा हा पती-पत्नीच्या नात्यातला भावनिक पदर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने उलगडला.
डॉ. अंबरीश दरक दिग्दर्शित ‘अनुराग’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि धर्मेंद्र गोहिल हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर गेली २५ वर्षे अनेक चित्रपट चित्रित केलेले छायालेखक सुरेश देशमाने यांनी लेह-लडाखचा अप्रतिम निसर्ग टिपला आहे. मृण्मयी देशपांडे हिने अभिनयासोबत चित्रपटाचे सहदिग्दर्शनसुद्धा केले आहे. तसेच गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, समीर म्हात्रे यांनी संगीत-पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. आरआरपी कॉर्पोरेशन लिमिटेडची निर्मिती असलेला हा चित्रपट मृण्मयी देशपांडे क्रिएशन्स प्रस्तुत आहे. अनुराग चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अचानक होणाऱ्या बदलांना तोंड देत, शारीरिक क्षमतेच्या कसोटीचा अनुभवदेखील तिने या वेळी सांगितला.
‘अनुराग’ या चित्रपटातील तब्बल १८ हजार ५०० फुटांवरील लेह-लडाख येथे झालेले चित्रीकरण, दोनच व्यक्तिरेखा तसेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा प्रस्तुतकर्ती म्हणून असणारा पहिला प्रयत्न, अशा अनेक कारणांनी ‘अनुराग’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतीक्षेत असतील हे नक्कीच. प्रेक्षकांची हीच उत्सुकता संपविण्यासाठी हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘चित्रपटाची कथा मला खूपच आवडली. त्यामुळे अभिनय करण्याच्या निमित्ताने या चित्रपटाशी जोडली गेले. या चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर या टीमशी नाते घट्ट होत गेले. त्यामुळे अभिनय करण्यापलीकडे जाऊन चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरवले,’ अशी भावना मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केली.
मी ‘आय स्पेशालिस्ट’ आहे. त्यामुळे मेडिकल प्रॅक्टिस करताना ‘मेड फॉर इच अदर’पासून पूर्णपणे स्वतंत्र अशी अनेक जोडपी भेटली. त्यातील बहुतेकांना नात्याचा उबग आल्याचे जाणवत होते. लग्नानंतर एका टप्प्यावर आल्यावर प्रेम संपते कसे, नात्यात अपुरेपणा का निर्माण होतो, असे प्रश्न पडू लागले. या बदलणाऱ्या नात्यांविषयी काही तरी करावे, या नात्यांचा पुन्हा एकदा शोध घ्यावा, असे वाटत होते. त्यामुळे चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. अंबरीश दरक यांनी सांगितले.