गडबड घोटाळ्याचा धमाल ‘आनंद’..!

By Admin | Updated: February 19, 2017 03:34 IST2017-02-19T03:34:41+5:302017-02-19T03:34:41+5:30

रंगभूमीवर सादर होणारा फार्स म्हणजे धमाल-मस्तीची मेजवानीच असते आणि एकावर एक मारलेल्या थापा हा फार्सचा जीव असतो. साहजिकच, अशा नाटकात हंशा आणि टाळ्यांचा

'Anand' is a distraction in the scam! | गडबड घोटाळ्याचा धमाल ‘आनंद’..!

गडबड घोटाळ्याचा धमाल ‘आनंद’..!

- राज चिंचणकर

रंगभूमीवर सादर होणारा फार्स म्हणजे धमाल-मस्तीची मेजवानीच असते आणि एकावर एक मारलेल्या थापा हा फार्सचा जीव असतो. साहजिकच, अशा नाटकात हंशा आणि टाळ्यांचा गजर होणारच हे अपेक्षितच असते. ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकानेही ही परंपरा मोडलेली नाही. परिणामी, हास्याची ‘नॉनस्टॉप’ कारंजी उडवण्याचे काम या नाटकाने केले आहे. यात निर्माण करण्यात आलेला एकंदर घोटाळा अनुभवताना, शब्दश: मिळणारा ‘आनंद’ ही या नाटकाची खासियत ठरली आहे.
फार्स या नाट्यप्रकारात कलाकारांवर मोठी भिस्त असते आणि या नाटकातल्या सर्वच कलावंतांनी त्याचे योग्य ते भान राखले आहे. या नाटकातली खरोखरच आनंदाची बाब म्हणजे, यात प्रमुख भूमिका साकारणारा आनंद इंगळे हा हरहुन्नरी नट! आनंदने हे नाटक प्रचंड गतीने घुमवत ठेवले आहे. त्याच्यासोबत त्याच्याभोवतालची पात्रेही तितक्याच चपळाईने कार्यरत झालेली दिसतात आणि या सगळ्यांसोबत प्रेक्षकांनाही गरागरा फिरवण्याची किमया या नाटकाने केली आहे.
तसे पाहायला गेल्यास ज्या घटनेवरून हे नाटक सुरू होते, तो तसा जुनाच फॉर्म्युला आहे. मात्र त्यावरून या नाटकाने जो काही धिंगाणा घातला आहे, तो मात्र गडाबडा लोळायला लावणारा आहे. बॅगांची अदलाबदल होणे ही कथानकांतली तशी परिचित गोष्ट आणि या नाटकाचा नायक दिलीप याच्याबाबतीत अगदी तेच घडलेले आहे. पुण्याहून निघताना बॅगेत भाकरवड्या घेतलेल्या दिलीपच्या बॅगेची प्रवासात अदलाबदल होते आणि बदललेल्या या बॅगेत तब्बल ‘९ कोटी ५७ लाख’ रकमेची रोकड त्याला सापडते. या ‘छप्पर फाड़’ घटनेने त्याच्या डोळ्यांपुढे भविष्यातले प्लॅन तरळायला सुरुवात होते. मात्र त्याची बायको अंजली ही त्याला गांभीर्याची सतत जाणीव करून देत राहते. अशातच एक डिटेक्टिव्ह, एक पोलीस इन्स्पेक्टर आणि मित्रवर्य सतीश व त्यांची बायको राधा ही सगळी मंडळी दिलीपच्या घरी टपकतात. यापुढे जो काही सावळागोंधळ होतो, तो थेट रंगभूमीवरच पाहणे इष्ट ठरेल.
संजय मोने यांनी या नाटकासाठी लेखणी हाती धरली आहे आणि तिच्यातली शाई नाटकभर उत्तम झिरपली आहे. चढत्या भाजणीने त्यांनी केलेली प्रसंगांची मांडणी नाटकाचे विमान थेट ‘सातवे आसमानपर’ नेऊन पोहोचवते. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या विमानाला रंगभूमीच्या अवकाशात भन्नाट वेगाने फिरवले आहे. फार्स उभा करताना दिग्दर्शक व नटांचे जे ट्युनिंग जमायला हवे, त्याचे चांगले उदाहरण या नाटकात दिसते. फार्सला आवश्यक असलेली गती राखत, एकाहून एक अशा अतरंगी पात्रांची मोट त्यांनी अचूक बांधली आहे. यातल्या पात्रांच्या सतत बदलणाऱ्या नावांच्या गमतीजमतीही मजा आणतात. फक्त नाटकातल्या टॅक्सीवाल्याच्या नाट्यस्वगतांना त्यांनी थोडी मर्यादा घालायला हवी होती.
शोधायला गेल्यास नाटकात काही उणिवा सापडतातही; परंतु या नाटकाने स्वीकारलेल्या वेगात त्या सहज विरघळून जातात. रंगभूमी हे नटांचे माध्यम आहे, हे तंतोतंत खरे ठरवत या नाटकातल्या कलावंतांनी यात धुमाकूळ घातला आहे. दिलीपची भूमिका वठवणाऱ्या आनंद इंगळे याने श्वास घेण्यासाठीही उसंत न बाळगता दोन्ही अंकांत धमाल उडवून दिली आहे. त्याच्या मुद्रेवरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव, त्याने देहबोलीचा केलेला चपखल उपयोग, अचूक टायमिंग आणि त्याचे रिअ‍ॅक्ट होणे लाजवाब आहे. प्रचंड स्टॅमिना वापरत त्याने नाटकात केलेली पळापळ पाहता, त्याला ही भूमिका साकारताना थकवा कसा येत नाही हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
सुलेखा तळवलकर (अंजली), संजय मोने (सतीश), मंगेश साळवी (टॅक्सीवाला व बडा भाई), विवेक गोरे (इन्स्पेक्टर), रेणुका बोधनकर (राधा), राहुल कुलकर्णी (डिटेक्टिव्ह) यांची अभिनयातली कामगिरी एकजिनसी आहे. आपापला योग्य तो वाटा या मंडळींनी परिणामकारकतेने उचलला आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना व नितीन कायरकर यांची संगीतसाथ नाट्याला साजेशी आहे. हे नाटक म्हणजे फूल टू कॉमेडीचा तडका असल्याने, डोक्याला वायफळ प्रश्न पडू न देता त्याचा आस्वाद घेणे उचित ठरेल. कारण त्यामुळेच दोन घटका निव्वळ हास्यरंजन करण्याचा या नाटकाचा हेतू सफल होईल.

Web Title: 'Anand' is a distraction in the scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.