मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘अमृतमयी’ पदार्पण
By Admin | Updated: September 12, 2015 04:08 IST2015-09-12T04:08:12+5:302015-09-12T04:08:12+5:30
चित्रपट, मालिकांचे पार्श्वगायक म्हटले, की काही नेहमीच्या गायकांची म्हणजे बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, राहुल देशपांडे, श्रावणी रवींद्र अशी काही नावे डोळ्यांसमोर येतात.

मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘अमृतमयी’ पदार्पण
चित्रपट, मालिकांचे पार्श्वगायक म्हटले, की काही नेहमीच्या गायकांची म्हणजे बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, राहुल देशपांडे, श्रावणी रवींद्र अशी काही नावे डोळ्यांसमोर येतात. पण आता या गायकांच्या यादीत एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची भर पडणार आहे. ते नाव आहे अमृता फडणवीस! या कोण आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला निश्चितच अवगत आहे. यापुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असलेल्या अमृता फडणवीस यांची संगीत क्षेत्रात लवकरच एक नवीन ओळख प्रस्थापित होणार आहे. यापूर्वी गुढीपाडव्याला शासनाच्या ‘बेटी बचाओ’ या योजनेसाठी ‘तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या’ हे गाणे त्यांनी गाऊन आपल्या मधुर आवाजाची झलक सर्वांनाच दिली होती. आता चित्रपटात पार्श्वगायिकेच्या रूपात त्या पदार्पण करीत आहेत.
बीजेपी फिल्म युनियनच्या वतीने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनचरित्रावर ‘संघर्षयात्रा’ हा चित्रपट येत आहे. त्यामध्ये ‘तू चल पुढे, बघ धूळ भिडे ही आसमानाला, जिंकून घे दाही दिशा, गर्जना कर यशाची, फिकीर तुला रे कशाची, ही यात्रा संघर्षाची’ असे शीर्षकगीत गाऊन त्यांनी सगळ्यांनाच एक गोड धक्का दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन साकार राऊत यांनी केले असून, संगीत श्रीरंग उऱ्हेकर यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप घुगे, साईनाथ बाजी, राजीव बाजी आणि मुकुंद कुलकर्णी यांची असून शब्दांचे बोल मंदार चोळकर यांचे आहेत. याविषयी उऱ्हेकर सांगतात, ‘बेटी बचाओ’साठी त्यांच्याकडून गाणे गाऊन घेतले होते. त्यामुळे हे गाणे करतानाही डोळ्यासमोर अमृता फडणवीस यांचेच नाव आले. आपल्या आग्रहास्तव आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आत्मीयतेने गाणे रेकॉर्डिंग करण्यास अमृता फडणवीस यांनी तत्काळ होकार दिला. तब्बल आठ ते दहा दिवस त्यांनी या गाण्याचा सराव केला. नुकतेच यशराज स्टुडिओमध्ये त्यांच्या या गाण्याचे विजय दयाळ यांनी रेकॉर्डिंग केले. या चित्रपटाचे जवळपास ६५% काम पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये चित्रपट
प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे निर्माते संदीप घुगे यांनी सांगितले.