अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:06 IST2025-06-24T12:05:16+5:302025-06-24T12:06:22+5:30

मी अगदी मनापासून सांगते मला फरक पडत नाही कारण...

amruta khanvilkar lashes out at trollers who trolled her regarding doing puja alone at new home | अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न

अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) बिंधास्त आणि दिलखुलास स्वभावाची आहे. ती कायम तिचे विचार सडेतोडपणे मांडताना दिसते. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी अमृताने मुंबईत स्वत:चं घर घेतलं. घराचा सविस्तर व्हिडिओ तिने युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. यात तिने घराची झलक दाखवली. दरम्यान नवीन घर घेतल्यानंतर तिने छोटी पूजाही केली होती. मात्र पूजेला जोडीने न बसता एकटीच बसल्याने तिला खूप ट्रोल केलं गेलं. नुकतंच तिने ट्रोलर्सला सुनावलं आहे.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता खानविलकर म्हणाली, "आता मी घराचा व्हिडिओ टाकला. त्यात मला ट्रोल केलं गेलं कारण मी पूजेला एकटी बसले होते. बरं ती वास्तुशांत नव्हती. कारण मी ती नंतर करणार होते. तर घरातल्या घरात एक छोटी पूजा केली. हिमांशुचं रात्री शूटिंग होतं त्यामुळे त्याला यायला फार वेळ होता. तर गुरुजी म्हणाले की ठिके तुम्ही बसा काहीच हरकत नाही. तसंही आता घरातली कुठलीतरी पूजा वगैरे असेल तर मी एरवी करतेच. कारण सतत आपलं ते हिमांशु आणि माझी वेळ जुळवा,  मग गुरुजींची वेळ घ्या असं खूप गुंतागुंतीचं होतं. मग हिमांशु नंतर आला. मी आपलं सकाळी सगळं उरकून घेतलं होतं. सगळ्यांच्या वेळा जुळवून मी ती पूजा केली. आता मी घर घेऊ शकते, मी पैसे कमवू शकते पण मी पूजेला एकटी बसू शकत नाही? असं काय आहे यार? मला तुमच्या भावना समजतायेत की जोडीने पूजेला बसलं पाहिजे. पण प्लीज..तुम्ही म्हणून इतकं टोकाला जाऊन मला ट्रोल करणार."


ती पुढे म्हणाली, "विशेष म्हणजे बायकाच बोलतात...अरे का तुम्ही असं करता? ठिके काहीही होत नाही...अमुक होतं तमुक होतं...नाही, तुमच्या मनात काही चूक नसेल ना मग ओके आहे. मी मनातल्या मनात स्वामींशी बोलते तेव्हा मला वाटत नाही मी काही चुकीचं करतीये. जेव्हा त्यांच्याकडून मला काही येत नाहीये मग का लोक विशेषत: स्त्रियाच असं बोलतात यार. मी अगदी मनापासून सांगते मला फरक पडत नाही कारण माझे व्ह्यू वाढतात. त्यातून जे पैसे येतात ते माझ्याच अकाऊंटला येतात. त्यामुळे माझं काहीही नुकसान होत नाहीये. पण मी कोणत्या भावनेतून हा व्हिडिओ केला आहे हेही बघा. आज एका स्त्रीने स्वत:च्या पायावर उभं राहणं, स्वत:साठी घर घेणं किती गरजेचं आहे. जर ते तुम्ही करु शकता तर ते तुम्ही साजरंही करु शकता. तुम्हाला कोणाची गरज नाही. याचा अर्थ मी एकटीनेच करा असं म्हणत नाहीये. पण घरातल्या सगळ्यांना प्रेम देऊन स्वत:साठीही काहीतरी करणं ही भावना तुम्ही अनुभवू शकता. यात काहीच वावगं नाही."

Web Title: amruta khanvilkar lashes out at trollers who trolled her regarding doing puja alone at new home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.