वयाच्या ८२ व्या वर्षी अमिताभ बच्चन शिकत आहेत इन्स्टाग्राम, शेअर केला मजेशीर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:25 IST2025-07-30T17:24:47+5:302025-07-30T17:25:10+5:30
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

वयाच्या ८२ व्या वर्षी अमिताभ बच्चन शिकत आहेत इन्स्टाग्राम, शेअर केला मजेशीर व्हिडीओ
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. ते कायम चर्चेत असतात. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. आता त्यांनी इन्स्टाग्राम वापरण्याचं 'शिकणं' सुरू केलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ते म्हणतात, "मी इन्स्टाग्राम वापरायला शिकत आहे... आशा आहे की हे योग्यरित्या काम करेल, धन्यवाद". अमिताभ यांचा हा हलकाफुलका अंदाज पाहून चाहत्यांनीही व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केलाय. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम वापरण्याचा अनुभव त्यांनी आपल्या ब्लॉगमध्येही शेअर केलाय. त्यांनी लिहलं, "काल शिकण्याबद्दल बोललो होतो, आणि आज काहीतरी नवीन शिकलो... होय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ते कसं केलं हेच विसरलोय... ठीक आहे, चला उद्या पुन्हा प्रयत्न करूया".
दरम्यान, अमिताभ यांचे इन्स्टाग्रामवर ३७ मिलियन फॉलोअर्स आहेत. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचा पुढील १७ वा सीझन ते घेऊन येत आहे. केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कित्येक वर्षांपासून ते या शोचा भाग आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चन दिवाळखोर व्हायला आले होते. तेव्हा याच शोने त्यांन तारलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, कौन बनेगा करोडपती १७ साठी बिग बी दर एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेणार आहेत. शोच्या मेकर्सने मात्र याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.