आलिया, महेश भट्टना जीवे मारण्याची धमकी देणा-याला अटक
By Admin | Updated: March 2, 2017 10:56 IST2017-03-02T08:57:02+5:302017-03-02T10:56:48+5:30
चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट, पत्नी सोनी राझदान आणि मुलगी, अभिनेत्री आलिया भट्टना जीवे मारण्याची धमकी देणा-या व्यक्तीला लखनऊमधून अटक करण्यात आली.

आलिया, महेश भट्टना जीवे मारण्याची धमकी देणा-याला अटक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट्, त्यांची पत्नी सोनी राझदान आणि मुलगी, अभिनेत्री आलिया भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संदीप साहू (वय २४) याला लखनऊमधून अटक करण्यात आली आहे.
२६ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने भट्ट यांना फोन करून ५० लाखांची खंडणी मागितली होती व पैसे न दिल्यास सोनी व आलिया या दोघींनाही ठार मारू अशी धमकीही त्याने दिली होती. याप्रकरणी भट्ट यांनी बुधवारी रात्री खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता हे प्रकार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आले. अखेर पोलिसांनी संदीप साहूला लखनऊ येथून ताब्यात घेतले.
तर आलिया व सोनीवर गोळ्या झाडेन
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण एका गँगचे लीडर असल्याचे सांगत एका व्यक्तीने महेश भट्ट यांना फोन करून त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. मात्र कोणीतरी आपली मस्करी करत असल्याचे भट्ट यांना वाटले. पण काही वेळानंतर त्या व्यक्तीने भट्ट यांना या धमकीकडे दुर्लक्ष करू नये असे सांगत टेक्स्ट आणि व्हॉट्सअॅपवर मेसेजेस पाठवले.
' मी जे सांगतोय ते ऐकलं नाही तर मी तुमची बायको सोनी आणि मुलगी आलिया यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करेन' असेही त्याने धमकी देताना म्हटले. काही काळ तो भट्टना सतत मेसेजेस पाठवत होता, मात्र थोड्या वेलाने त्याने मेसेजेस थांबवले. त्याने भट्टना एका विशिष्ट बँकेच्या लखनऊमधील ब्रांचमध्ये पैसे भरण्यास सांगितले.