ऊर्मिला साकारणार ‘अहिल्याबाई होळकर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:34 IST2016-08-01T02:34:09+5:302016-08-01T02:34:09+5:30
‘आवाज’ या सिरिजमध्ये संत ज्ञानेश्वर आणि महात्मा फुले यांच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

ऊर्मिला साकारणार ‘अहिल्याबाई होळकर’
‘आवाज’ या सिरिजमध्ये संत ज्ञानेश्वर आणि महात्मा फुले यांच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. याची निर्मिती कोठारे प्रोडक्शनचीच असून महेश कोठारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत तर ऊर्मिला कानेटकर कोठारे या मालिकेत अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी ऊर्मिला सांगते, ‘अहिल्याबार्ई होळकर यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेची निर्मिती करायची ठरल्यानंतर त्यांची भूमिका मी साकारावी असे महेश कोठारे यांचे म्हणणे होते. त्यांनी या भूमिकेबद्दल विचारल्यावर लगेचच मी होकार दिला. आपण अहिल्याबाई होळकर यांच्या समाजकार्याबाबत ऐकले आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. आम्ही या मालिकेत त्यांच्या समाज कार्यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अहिल्याबाई कशा होत्या हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या आयुष्यावर आधारित विनया खडपेकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचले. या पुस्तकाची मला भूमिका साकारण्यासाठी खूपच मदत झाली. या मालिकेसाठी माझी वेशभूषा ही नलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी केलेली आहे. अहिल्याबाई यांचा कोणताही फोटो उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या काढलेल्या चित्रांनुसारच ही रंगभूषा करण्यात आलेली आहे. अतिशय ठराविक भागांत महान लोकांचे आयुष्य लोकांसमोर मांडण्याची कलर्स मराठी या वाहिनीची संकल्पना खूपच छान असून अहिल्याबाई होळकर ही व्यक्तिरेखा साकारत असल्याचा मला आनंद होत आहे’, असेही ती म्हणते.