पुन्हा होणार नोटाबंदी पण...
By Admin | Updated: March 7, 2017 18:32 IST2017-03-07T18:31:59+5:302017-03-07T18:32:57+5:30
केंद्र सरकारने लागू केलेली नोटाबंदी निर्णयाची झळ तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

पुन्हा होणार नोटाबंदी पण...
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - केंद्र सरकारने लागू केलेली नोटाबंदी निर्णयाची झळ तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ही बातमी वाचून तुम्ही लगेच धसका घेऊ नका. जरा थांबा... नोटाबंदीची झळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे अगदी खरं आहे. मात्र ती दैनंदिन आयुष्यात नाही तर मोठ्या पडद्यावर.
म्हणजे, आता केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णय नोटाबंदीवर सिनेमा बनवण्यात येणार आहे. टॉलिवूडचे दिग्गज सिनेनिर्माता भारतीराजा तामिळ भाषेमध्ये 'नोटाबंदी'वर सिनेमा बनवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'नोव्हेंबर 8...इरावू इत्तू मणि' असे या सिनेमाचे नाव असून त्याचे शुटिंगही सुरू झाले आहे.
सिनेमाचे शुटिंग मुख्यतः चेन्नई आणि पाँडेचेरी येथे करण्यात येणार आहे. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,'नोटाबंदी निर्णय लागू झाल्यानंतरच्या घडामोडींवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. सिनेनिर्माता सध्या एका वयोवृद्ध पात्राच्या शोधात आहे. त्यांना हवा तसा व्यक्ती न मिळाल्यास ते स्वतःच ही भूमिका साकारणार आहेत'.
दरम्यान, दोन महिन्यांत सिनेमाचे शुटिंग पूर्ण होणार आहे. रत्नकुमार यांनी सिनेमाची कथा लिहिली असून संगीतासाठी सुप्रसिद्ध संगीतकार इलयराजा यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्यापपर्यंत अंतिम निर्णय ठरवण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी ऐतिहासिक नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. या निर्णयात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या.
नुकतेच आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने नोटाबंदी निर्णयाची स्तुती केली होती. 'नोटाबंदीचा भारतीय वित्तीय स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल', असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचाराला चाप लागेल, असे मुडीजने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आपल्या अहवालात म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था संकटांचा सामना करण्याच्या बाबतीत मजबूत आहे. चलनी नोटांच्या तुटवड्याचा काळही आता निघून गेला आहे. याची आता मागणी आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
अमेरिकी संस्था असलेल्या मुडीजने म्हटले की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताचा वृद्धीदर मात्र घसरून ६.४ टक्क्यांवर येईल. मागील तीन तिमाहींत तो ७ टक्के आहे. भविष्यकाळाकडे पाहताना चलन तुटवडा भरून काढण्याची प्रक्रिया आहे त्याच गतीने सुरू राहील, अशी आम्हास अपेक्षा आहे.