रेखा यांनी लिहिलेलं पत्र वाचून आमीरला अश्रू अनावर
By Admin | Updated: February 16, 2017 12:07 IST2017-02-16T12:00:25+5:302017-02-16T12:07:16+5:30
दंगल चित्रपट पाहिल्यानंतर रेखा यांनी आमीर खानला पत्र लिहून त्याने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

रेखा यांनी लिहिलेलं पत्र वाचून आमीरला अश्रू अनावर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आमीर खानसहित चित्रपटातील इतर कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच बॉक्स ऑफिससहित प्रेक्षकांच्या ह्रदयावरही आमीरने दंगलच केली असं म्हणाव लागेल. फक्त प्रेक्षकच कशाला अनेक सेलिब्रेटींनाही आमीर खानने आश्चर्यचकित करुन सोडलं. अनेकजणांनी तर आपण निशब्द झाल्याची भावना व्यक्त केली होती.
आमीरच्या दंगल चित्रपटाच्या प्रेमात पडलेल्यांमध्ये सर्वात वरती नाव आहे ते ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं. त्यांना हा चित्रपट इतका आवडला की त्यांनी आमीर खानला पत्र लिहून त्याने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दंगल चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत रेखा यांनी हे पत्र स्वत: आमीरला देत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा यांनी लिहिलेलं पत्र वाचून आमीर खान इतका भावूक झाला की त्याला अश्रू अनावर झाले. 'हे पत्र आपण जपून ठेवणार आहोत. हा चित्रपट आपल्याला किती आवडला आहे हे सांगण्यासाठी रेखाजी स्वत: आल्या, यामुळे दंगल चित्रपटाप्रमाणे या पत्रानेही माझ्या ह्रदयात विशेष जागा तयार केली आहे', असं आमीर खान बोलला आहे.